अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा संघटना संयुक्त फेडरेशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
रिक्षा चालकांचे प्रश्न तातडीने सोडवावे, अन्यथ तीव्र आंदोलन – अविनाश घुले
नगर – अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा संयुक्त फेडरेशनच्यावतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. याप्रसंगी खासदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, जिल्हाध्यक्ष वैभव जगताप, कॉ.बाबा आरगडे, विलास कराळे, दत्ता वामन, अशोक औशिकर, लतिफ शेख, गणेश आटोळे, नासिर खान, शेख गुलाम दस्तगिर, समीर कुरेशी, विजू शेलार, निर्मल गायकवाड, बबन बारस्कर, भैय्या पठाण, विष्णू आंबेकर, सुनिल रासकर, सचिन तनपुरे, गोरख रणदिवे, अशोकराव चोभे, गोविंद पोकळे, जुनेद बागवान, निलेश कांबळे, हनुमंत दारकुंडे, श्रीधर दारुणकर, बाळू उबाळे, आदिंसह रिक्षा चालक, तीन चाकी, विद्यार्थी वाहतुक करणार्या सर्व रिक्षा संघटना आदि उपस्थित होते.
यावेळी फेडरेशनच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या. ऑटो रिक्षा परवानाधारक फिटनेस लेट दंड रोज 50 रुपये रद्द करावा, महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा चालकांच्या प्रगतीसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, महाराष्ट्र सरकारने ऑटो रिक्षाचे खुले परवाना धोरण रद्द करावे, अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ऑटो रिक्षा चालकाच्या गाड्या पासिंग व इतर कामासाठी आरटीओ ऑफिसने मदत नेमून रिक्षा चालकांना सरकारी कामांमध्ये मदत करावी. बेकायदा होणारी आर्थिक लुट थांबवावी आदिंचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष अविनाश घुले म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून रिक्षा फिटनेस बाबत आकारण्यात येणारा दर दिवशीचा 50 रुपयांचा दंड रद्द करावा, यासाठी राज्यभर संघटनेच्यावतीने आंदोलने सुरु आहेत. छोटी वाहने, मोठी वाहने, बस, लक्झरी यांनाही तेवढाच दंड तसेच मेट्रो सिटीमध्येही तितकाच दंड आकारण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील रिक्षा चालकांना याचा मोठा फटका बसत आहे. प्रत्येक शहराच्या दर्जेनुसार तेथील व्यवसाय होत असतो. नगरची बरोबरोबरी पुणे-मुंबई बरोबर होऊ शकत नाही. त्यामुळे याचा शासनाने विचार करावा. तसेच कल्याणकारी मंडळ, खुले परवाने धोरण रद्द करणे असे अनेक प्रलंबित प्रश्न शासन दरबारी आहेत. हे प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत यासाठी हे आंदोलन केले आहे, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करु, असे सांगितले.
यावेळी आ.संग्राम जगताप म्हणाले, रिक्षा संघटनेच्याबाबत आम्ही मागील काही दिवसांपासून वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, परिवहन मंत्री यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. याबाबत आचारसंहिता संपल्यानंतर या प्रश्नांबाबत मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच पुणा रिक्षा पंचायतचे पदाधिकारी व नगरमधील काही पदाधिकारी यांची बैठक माझ्या उपस्थितीत झाली. हा प्रश्न नगरचाच नसून संपूर्ण राज्याचा आहे. त्यावर लवकरच मार्ग काढू असे त्यांनी सांगितले.
यावेळी खा.निलेश लंके म्हणाले, रिक्षा चालकांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री, परिवहन मंत्री यांच्याशी आपण स्वत: चर्चा करु. तसेच नवीदिल्लीत केंद्रीय परिवहन मंत्र्यांशी चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले.
या मोर्चात अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना, जिल्हा रिक्षा पंचायत, प्रजा ऑटो रिक्षा संघटना, जिल्हा परवानाधारक विद्यार्थी वाहतुक संघटना, शाहिद फ्रेंडस् सर्कल रिक्षा संघटना, लोकराज्य रिक्षा संघटना, महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी-विक्री संघटना, अहमदनगर लक्झरी स्कूल बस असोसिएशन आदिंसह विविध संघटनेचे पदाधिकारी, चालक-मालक या मोर्चात सहभागी झाले होते.
सदर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरु होऊन माळीवाडा, पंचपीर चावडी, माणिक चौक, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रोड, दिल्लीगेट मार्गे लालटाकी, तारकपुर, डीएसपी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय येथे नेण्यात आला. येथे मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. त्यानंतर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याशी चर्चा करुन निवेदन देण्यात आले.