कल्याण रोड, ज्येष्ठ नागरिक महासंघाचा निलेश लंके यांना जाहीर पाठिंबा
ज्येष्ठ नागरिकांनी आपणास पाठिंबा देऊन त्यांच्या अनुभवातून आपला विजय निश्चित केला – निलेश लंके
नगर – ज्येष्ठ नागरिक हे समाजाचा मुख्य कणा आहेत, त्यांनी आपल्या उमेदीच्या काळात नोकरी, व्यवसायाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान दिलेले असते. त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले असल्याने त्यांचा एकंदरीत अनुभव हा दांडगा असतो. या अनुभवाचा उपयोग युवा पिढीसाठी मार्गदर्शक असतो. कल्याण रोड परिसरातील विकासात ज्येष्ठ नागरिकांचे मोठे योगदान राहिले आहे. या भागातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून हा भाग चांगला विकसित होत आहे. या भागाला आदर्शवत करण्यासाठी आपले कायम सहकार्य राहील. त्यांचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांसाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न करु. आज या ज्येष्ठ नागरिकांनी आपणास पाठिंबा देऊन त्यांच्या अनुभवातून आपला विजय निश्चित केला आहे, असे प्रतिपादन उमेदवार निलेश लंके यांनी केले.
कल्याण रोड येथील ज्येष्ठ नागरिक महासंघाच्यावतीने महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. याप्रसंगी उमेदवार निलेश लंके, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, बाळासाहेब हराळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष खासेराव शितोळे, संजय शेंडगे, सचिन शिंदे, अनिल बोरुडे, शाम नळकांडे, दत्ता जाधव, प्रशांत गायकवाड, दिपक खैरे, संतोष गेनप्पा, संदिप दातरंगे आदिंसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, निलेश लंके यांची सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच तळमळ राहिली आहे. कोणीही त्यांच्याकडे काम घेऊन गेल्यास रिकाम्या हाताने परतत नाही. अशा कार्यक्षम व्यक्तीस लोकसभेत पाठविण्याचा निर्धार नगरकरांनी केला आहे. त्यामुळेच सर्वस्तरातून त्यांना पाठिंबा मिळत आहे. नगरमधूनही महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष त्यांच्या विजयासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यावेळी बाळासाहेब हराळ म्हणाले, सध्याचे खासदार आपल्या भागात कधी फिरकलेच नाही, ते फक्त निवडणुकीपुरते मतदार संघात दिसतात. नागरिक, शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच आघाडीवर ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे निलेश लंके यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.
याप्रसंगी खासेराव शितोळे म्हणाले, आज ज्येष्ठ नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत, त्याकडे सर्वच दुर्लक्ष करतांना दिसत आहेत. परंतु आज जेष्ठ नागरिकांची संख्या आणि अनुभव पाहता ते जिद्दीला पेटल्यावर काहीही करु शकतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दुर्लक्षित करुन चालणार नाही. त्यांचे पेन्शन, मानधन व त्यांच्यासाठीच्या शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. उमेदवार निलेश लंके यांनी आमच्या प्रश्नांसाठी केंद्र व राज्य पातळीवर प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.