काव्य संमेलनातून विविध प्रश्न व सामाजिक विषयांवर जागृती
निमगाव वाघात रंगलेल्या काव्य संमेलनात प्रज्ञावंतांना पुरस्कार प्रदान
कवी, लेखकांची सामाजिक जागृकतेसाठी भूमिका महत्त्वाची – माधवराव लामखडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने पाचवे राज्यस्तरीय काव्य संमेलन उत्साहात पार पडले. छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त झालेल्या काव्य संमेलनात ज्येष्ठ कवी व नवोदित कवींनी आपल्या काव्यातून समाजातील वास्तवतेचे दर्शन घडवून विविध प्रश्न व सामाजिक विषयांवर जागृती केली.
परिवार मंगल कार्यालयात झालेल्या काव्य संमेलनाचे उद्घाटन उद्योजक माधवराव लामखडे यांच्या हस्ते झाले. यावेळी काव्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी आनंदा साळवे, स्वागताध्यक्षा तथा जिजाऊ व्याख्यात्या अनिता काळे, विशेष सरकारी वकील ॲड. मनिषा केळगंद्रे-शिंदे, शहर वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शमुवेल गायकवाड, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, काव्य संमेलनाचे संयोजक तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, कवी सरोज अल्हाट, गझलकार रज्जाक शेख, उद्योजक दिलावर शेख, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, भागचंद जाधव, डॉ. विजय जाधव, चंद्रकांत पवार, मुख्याध्यापक रंगनाथ साबळे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, मुख्याध्यापक भाऊसाहेब रोहोकले, गोरख चौरे, चंद्रकांत पवार, मयुर काळे आदींसह कवी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माधवराव लामखडे म्हणाले की, कवी, लेखक सामाजिक वास्तवतेचे दर्शन घडवितात. त्यांच्या लिखाणातून समाजाला दिशा मिळते व सामाजिक जागृकतेसाठी त्यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. कवीता हा जीवनाला स्फुर्ती व आनंद देत असतात. अस्सल मातीतल्या कवीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, खेळाडू, कलाकार, साहित्यिक व कवी यांना संस्थेच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु आहे. तर सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य करणाऱ्यांना पुरस्काररुपाने त्यांना स्फुर्ती दिली जात आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेऊन मतदार जागृती करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील प्रज्ञावंतांना छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्व सन्मान व राष्ट्र संत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार प्रदान करण्यात आला. दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन मतदार जागृतीसाठी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक शमुवेल गायकवाड, विशेष सरकारी वकील मनिषा केळगंद्रे-शिंदे, तात्यासाहेब कर्डिले, ह.भ.प. एकनाथ महाराज जाधव, रामचंद्र लोखंडे, संतोष महाराज खुडे यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
या काव्य संमेलनात गिताराम नरवडे, आनंदा साळवे, रज्जाक शेख, मिराबक्ष शेख, देवीदास बुधवंत, बाळासाहेब कोठुळे, ह.भ.प. निवृत्ती महाराज कानवडे, विजय मोरे, अलकनंदा शेळके, सिमा गायकवाड, चंद्रकांत चाबुकस्वार, श्रावणी भिंगारदिवे, सुनिता वाळुंज, आत्माराम शेवाळे, सविता कदम यांनी विविध विषयांवर कविता सादर केल्या. बाल शाहीर ओवी काळे व शिवशाहीर बलभिम निमसे यांनी सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. एकापेक्षा एक सरस सादरीकरण झालेल्या कविता व पोवाड्यांना उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका प्रियंका पाटील शेळके यांनी केले. संदीप डोंगरे यांनी आभार मानले.