अभियानाचा शुभारंभ बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या हस्ते वृक्षरोपणाने
साडे सात लाख फळझाडे लावण्याचे नियोजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- कासा (चर्चेस ऑक्झीलीअरी फोर सोशल अॅक्शन) संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून, संस्थेचा अमृतमहोत्सवी वर्ष पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपणाने साजरा केला जाणार आहे. संस्थेच्या वतीने संपुर्ण देशात साडे सात लाख तर महाराष्ट्रात एक लाख झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानाचे शुभारंभ अकोले तालुक्यातून बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या हस्ते वृक्षरोपणाने करण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी देशातील व महाराष्ट्रातील कासा संस्थेचे प्रमुख पदाधिकारी हजर होते.
बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे म्हणाल्या की, आरोग्याच्या दृष्टीने देशी वाण व बियांचे जतन करुन त्याची लागवड करणे काळाची गरज बनली आहे. कोरोना महामारीमुळे आरोग्याबाबत जागृकता निर्माण झाली. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गावरान देशी बियांपासून मिळणारा भाजीपाला, फळे उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. तर पर्यावरण संवर्धनासाठी कासा संस्थेने राबविलेला उपक्रम दिशादर्शक असल्याचे स्पष्ट केले. कासा पश्चिम विभागाचे मुख्य विभागीय अधिकारी के.व्ही. थॉमस यांनी संस्थेचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा होत असताना वृक्षरोपणाबरोबर समाजातील दुर्बल घटकांना प्रवाहात आनण्यासाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले व वृक्षरोपणाचे नियोजनाची माहिती दिली. या व्हिडिओ कॉन्फरन्सला अहमदनगर, औरंगाबाद, बीड, लातूर, गोंदिया, नंदुरबार तसेच गुजरात मधील उमरपाडा व डेदियापडा आदींसह इतर संलग्न संस्था व कार्यकर्ते ऑनलाईन हजर होते. अकोले येथे झालेल्या वृक्षरोपण कार्यक्रमासाठी कासा पश्चिम विभागाचे प्रकल्प अधिकारी जॉय्सिया थोरात, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गायकवाड, समन्वयक प्रभाकर दळवी, अस्मिता ढोले उपस्थितीत होते. व्हिडिओ कॉन्फरन्सचे तांत्रिक काम वैशाली कदम यांनी पाहिले.