संगमनेर दि.१५ प्रतिनिधी
मंत्रीपद असूनही तालुक्यात रोजगाराची कोणतीही साधनं निर्माण करता आली नाहीत, लोकांची कामे करण्यात तालुक्याच्या नेत्यांना कोणतेही स्वारस्य नाही, हेलपाटे मारायला लावण्यातच त्यांना स्वारस्य वाटते. तालुक्यातील जनतेने आता पर्याय शोधला पाहीजे. गावगुंडाच्या राजकारणापेक्षा विकासाचा मंत्र घेवून येणा-यांना पाठबळ द्या असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
तालुक्यातील खांबा येथे ना.विखे पाटील यांच्या उपस्थितीत सुमारे २५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. खांबा ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र दातिर यांच्यासह सर्व सदस्य आणि गावातील युवक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याप्रसंगी भाजपाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, संगमनेर तालुक्याला १४५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. महायुती सरकारमुळे मिळालेल्या निधीचे श्रेय कोणी घेत असले तरी जनता जागरुक आहेत. कारण वर्षानुवर्षे या भागाला रस्ते मिळाले नाहीत, पाण्याचा प्रश्न सुटला नाही. अनेक वर्षे मंत्रीपद मिळूनही रोजगारची कुठलीही साधनं तुम्हाला निर्माण करता आली नाहीत. मग तुमचा तालुका नेमका कशात पुढे आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दुष्काळी भागाला वरदान ठरणा-या निळवंडे धरणाचे कामही महायुती सरकारमुळे मार्गी लागले असून, भोजापूर चारीचा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल. पठार भागातील पाणी प्रश्नाबाबतही आपण गांभिर्याने सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करु अशी ग्वाही देतानाच युवकांच्या रोजगारासाठी आता जिल्ह्यात तीन औद्योगिक वसाहती विकसीत होत आहेत. यापुर्वी असे निर्णय होवू शकले नव्हते. अनेक उद्योजक आता जिल्ह्यात येण्यास तयार झाले आहेत. जिल्ह्यातील युवकांना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध करुन देण्याचे उदिष्ठ आपण ठेवले असून, जिल्ह्यामध्ये संत गाडगे बाबा कौशल्य प्रशिक्षण प्रबोधिनी स्थापन करण्याचा निर्णय केला आहे. संगमनेर तालुक्यातही ही कौशल्य प्रबोधिनी स्थापन करण्यास आपण प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून धनगर समाजाकरीता मेंढी व शेळी सहकार विकास महासंघाची स्थापना करण्यात आली असून, या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दूध उत्पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी ५ रुपये अनुदानाची योजना सुरु केली मात्र अनेक दूध संघानी शेतक-यांची माहीती उपलब्ध न करुन दिल्यामुळेच शेतकरी अनुदानापासून वंचित राहत आहेत. अनुदान मिळत नाही म्हणून सरकारच्या विरोधात ओरडणा-यांनीच अनुदान मिळण्यापासून शेतक-यांना वंचित ठेवल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.
मंत्री विखे पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. रणखांब आणि परिसरातील गावांमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. श्रीक्षेत्र बाळेश्वर येथेही विकास कामांचा भूमीपुजन समारंभ संपन्न झाला. श्रीक्षेत्र बाळेश्वर येथे पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून अधिक निधी उपलब्ध करुन देण्याचे त्यांनी सांगितले. याबाबत महसूल व वन विभागाच्या आधिका-यांना त्यांनी पर्यटन विकासाचा प्रकल्प आराखडा तयार करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.