जग बदलण्याची शक्ती तुमच्या हातात, हा संदेश देऊन सामाजिक उपक्रमाचे आयोजन
देशाच्या विकासात योगदान देणार्यांच्या हातावर बँड बांधून सामाजिक उपक्रमात सहभागी करुन घेण्याचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त टाटा व्हालिंटरींग सप्ताहतंर्गत सामाजिक, कला, आरोग्य, ज्ञान-विज्ञान, पर्यावरण आदी वेगवेगळया क्षेत्रात योगदान देण्यात येणार आहे. या सप्ताहाचा शुभारंभ जवानांच्या हातावर बँड बांधून करण्यात आला.
केडगाव येथील बॉस्को ग्रामीण विकास केंद्राच्या सभागृहात टाटा पॉवरच्या खांडके सुपा पवन ऊर्जा विभागातील अधिकार्यांनी जग बदलण्याची शक्ती तुमच्या हातात हा संदेश देऊन उपस्थित जवानांच्या हातावर बँड बांधले. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित भारतीय लष्करातील जवान व अधिकार्यांचा सन्मान करण्यात आला. टाटा उद्योग समूहाच्या वतीने संपुर्ण देशात हा सप्ताह साजरा होत आहे. या सप्ताहानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.
देश उभारणीत योगदान देणार्या सर्व घटकांना बँड बांधून त्यांना टाटा व्हालिंटरींग सप्ताहाच्या सामाजिक उपक्रमात सहभागी करुन घेतले जाणार आहे. जवळपास दहा हजार विविध क्षेत्रातील व्यक्तींना हा बँड बांधून त्यांचा सहभाग घेतला जाणार आहे. यामध्ये महिला, शेतकरी, शिक्षक, डॉक्टर, पोलिस, सफाई कर्मचारी, पत्रकार, वाहन चालक, हमाल, बांधकाम कामगार, आशा व अंगणवाडी कर्मचारी यांचा सहभाग असणार आहे.
टाटा पॉवर चे अपारंपरिक उर्जा विभागाचे समाज विकास अधिकारी विश्वास सोनवले म्हणाले की, टाटा उद्योग समुह सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन देशाच्या जडण-घडणीमध्ये महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. हा उपक्रम सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. सामान्य माणसांचा देशाच्या विकासात महत्त्वाचा वाटा आहे. विकास हा सर्व घटकांच्या हातभाराने साधला जाणार असून, या हातांचा सन्मान करण्यात येत असल्याचे सांगून त्यांनी उपक्रमाचे उद्दिष्टे सांगितले. टाटा पॉवरचे खांडके सूपा पवन ऊर्जा विभागातील कर्मचारी प्रवीण वाघ यांनी टाटा समूह हा नेहमीच सामाजिक व पर्यावरण संबंधी प्रश्न हाती घेउन कामे करीत आहेत. ह्या उपक्रमांमुळे सर्व कर्मचारी वर्ग समाजाशी एकरुप होऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हातभार लावत असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित सैनिक बांधवांनी या उपक्रमाचे कौतुक करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. बचत गटाच्या महिलांनी देखील टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे सांगितले. यावेळी बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे उपसंचालक नेल्सन मुदलियार, प्रकल्प अधिकारी अर्जुन शरणागाते, टाटा पॉवरचे प्रवीण शेंडकर, प्रतिक्षा नाईक, जयेश कोळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.