अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जुना मंगळवार बाजार येथे असलेल्या हुसेन शाहवली बाबा दर्गा भोवती स्थानिक नागरिकाने अतिक्रमण करुन दर्गाची विटंबना चालवली असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) वतीने करण्यात आला आहे. सदर धार्मिक स्थळाची विटंबना थांबविण्यासाठी दर्गालगत करण्यात आलेल्या अतिक्रमण हटविण्याची मागणी आरपीआयच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, शहर प्रवक्ता जमीर इनामदार, शहर कार्याध्यक्ष आजीम खान, संतोष पाडळे आदी उपस्थित होते.
जुना मंगळवार बाजार येथे सुमारे दोनशे वर्षा पूर्वीची हुसेन शाहवली बाबा यांची दर्गा आहे. सदर दरगेवर हिंदू-मुस्लिम समाजाची श्रध्दा आहे. सर्व समाजातील नागरिक दर्शन घेण्यासाठी दर्गावर येतात. परंतु ही दर्गा शहराच्या मध्यवस्तीत असल्याने दर्गे भोवती गायकवाड परिवाराने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे दर्गेवर दर्शनासाठी जाण्यासाठी भाविकांना जागा शिल्लक राहिलेली नाही. दर्गेला खेटून दोर्या बांधल्या असून, त्यावर दररोज महिला व पुरुषांचे कपडे वाळण्यासाठी टाकले जात आहे. याप्रकारामुळे एकप्रकारे बाबांची एकप्रकारे विटंबना होत असल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे. दररोज दर्गेला खेटून वस्त्रे वाळण्यासाठी टाकली जात आहे. अतिक्रमण करणार्या गायकवाड कुटुंबीयांच्या घराला दोन दरवाजे असून, मुद्दामहून दर्गेलगत असलेला दरवाजा वापर करीत आहे. यामुळे बाबांवर श्रध्दा असलेल्या भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहे. अशा प्रकरणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असून, जुना मंगळवार बाजार येथे असलेल्या हुसेन शाहवली बाबा दर्गा भोवती स्थानिक नागरिकाने केलेले अतिक्रमण हटवावे व कपडे वाळण्याचा प्रकार त्वरीत बंद करण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे. सदर निवेदन महापालिका आयुक्त व पोलीस अधिक्षक कार्यालय यांना देखील देण्यात आले आहे.