तोफखाना हद्दीत घटना घडलेली नसताना खोटा गुन्हा मागे घ्यावा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी
शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांची भेट घेऊन सीसीटिव्ही फुटेजचे पुरावे सादर
अहमदनगर (प्रतिनिधी)- घटना घडलेली नसताना तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये जमावाच्या मारहाण प्रकरणी दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) शिष्टमंडळाने शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांना दिले. तर घटनेच्या वेळी आरोपी इतर ठिकाणी असलेले सीसीटिव्ही फुटेज देखील पुरावा म्हणून सादर करण्यात आले. यावेळी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, गुलाम अली शेख, नईम शेख आदींसह पठाण कुटुंबीय उपस्थित होते.
28 एप्रिल रोजी जमावाच्या मारहाण युसुफ पठाण, राजू पठाण, रियाज पठाण, अयाज पठाण, नजीर पठाण, शाहरुख पठाण, नसीर पठाण यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु वास्तवमध्ये दाखल असलेला गुन्हा हा घडलाच नाही. ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला तो युसुफ पठाण हा अमीरमाळा या ठिकाणी गुन्हा घडलेल्या वेळेत काम करत असल्याचे सीसीटिव्ही फुटेज आहे. अयाज पठाण हा देखील जिओ पंप मागे तवले नगर समोर उपस्थित असल्याचा पुरावा सीसीटिव्ही फुजेटमध्ये आहे. तर यामधील राजू पठाण हा एक ते दोन महिन्यापासून कडा-आष्टी गावांमध्ये नातेवाईकांकडे आहे.
सीडीआर चौकशी केल्यास ते सुद्धा निष्पन्न होईल. याउलट फिर्याद देणाऱ्या व्यक्तीने व त्याच्या साथीदारांनी नासिर पठाण याला बेदम मारहाण केली. 27 एप्रिल रोजी नासिर याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलीस प्रशासनाने याप्रकरणी कोणत्याही प्रकारची चौकशी अथवा जबाब नोंदवून घेतला नाही. त्याने स्वतःचा अर्ज घेऊन तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात गेला, असता पोलीस निरीक्षक यांनी पीडित व्यक्तीला दम देऊन आपल्या मर्जीप्रमाणे अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करुन घेण्यास भाग पाडले. ज्याला मारहाण करण्यात आली त्याच्यावरच खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक व फिर्यादी यांच्यात काय संबंध आहे, ते देखील तपासण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याप्रकरणी चौकशी व्हावी, गुन्हा दाखल करुन घेणारे पोलीस निरीक्षक व ठाणे अमलदार यांच्यावर देखील कारवाई करुन खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा 16 मे रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.