अहमदनगर – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्वत्र अनिश्चितिततेचं सावट आहे. विशेषत: सणवार कसे साजरे करावेत याची चिंता सर्वांना आहे. अनेक कलाकार गणपतीच्या विविध रूपातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अहमदनगर शहरातील गणेश मूर्तीकार प्रफुल्ल लाटणे यांनी कोरोना विषयी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न देखाव्यातून सादर केला आहे.
अहमदनगर मधील कल्याण रोडवरील स्वप्नील आर्टस् या गणपती मूर्ती बनवणाऱ्या कारखान्याचे मालक प्रफुल्ल रामचंद्र लाटणे हे गेल्या २५ वर्षांपासून गणपती बाप्पांच्या मुर्त्या बनवतात. महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, गुजराथ, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आदी राज्यातून त्यांनी बनवलेल्या मुर्त्यांना मागणी असते. त्यांच्या या कारखान्यामुळे सुमारे ३० ते ४० कुटुंबाना रोजगार मिळाला आहे.
प्रफुल्ल लाटणे यावेळी म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनावर मात करीत जनतेचे स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे रक्षण केले. ठाकरे यांनी कोरोनाला पायाखाली दाबत गणपती बाप्पाला खांद्यावर विराजमान केले केले आहे असा देखावा तयार केला आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील आमदार निलेश लंके आणि आमदार संग्राम जगताप यांनीही कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधित रुग्णांना मोठा आधार दिला. कोविड सेंटर उभारून अनेक लोकांचे जीव त्यांनी वाचविले. माणसातील ‘देव माणूस’ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. म्हणून हा देखावा तयार केला आहे. याशिवाय विठ्ठल आणि शिर्डीचे साईबाबा अशा विविध वेशातील गणपती मूर्त्याही साकारल्या आहेत.
लाटणे यांच्या कारखान्यामध्ये पर्यावरणपूरक शाडूच्या आकर्षक अशा गणेशमूर्ती बनवल्या जातात. यावर्षी त्यांच्याकडे गजमुखी पॅटर्न, दगडूशेठ हलवाई, वसईचा राजा, लालबागचा राजा, चिंतामणी अशा विविध रूपातील गणपतींच्या मुर्त्या आहेत. गणपतीच्या मुर्त्या खरेदी करताना लाटणे यांच्या कारखान्यातील देखावे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.