अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील सहकार चळवळ वाचविण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. तरच सर्वसामान्य माणसांना न्याय मिळेल. खाजगीकरणाने देश पुन्हा भांडवलदारी गुलामीकडे जाईल. आत्ताचा काळ खुप अडचणीचा आहे. देशात अघोषीत आणिबाणीसारखी परिस्थिती दिसत आहे. देशातील मोठमोठ्या पुढार्यांना सामान्य जनतेच्या हिताच्या बाजूने उभे राहू न देता भांडवलदारी गुलामीच्या बाजूने लढायला लावले जात आहे. त्यांच्यामागे इडी, सीबीआय सारख्या चौकशा लावल्या जात आहेत कारण त्यांनी घोटाळे केल्याचेही दिसत असल्याचे प्रतिपादन कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसचिव कॉ.तुकाराम भस्मे यांनी केले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या किसानभवन मधे पार पडलेल्या जिल्हा कौन्सिलच्या बैठकित प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना कॉ. भस्मे बोलत होते. जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड पांडुरंग शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकिस कॉ. सुभाष लांडे, स्मिता पानसरे, संतोष खोडदे, बन्सी सातपुते, बहीरनाथ वाकळे, आप्पासाहेब वाबळे, विलास नवले, रामदास वागस्कर, सुरेश पानसरे, संजय नांगरे, बापूराव राशीनकर, भारत आरगडे, सुलाबाई आदमाने, निवृत्ती दातीर, कारभारी वीर, समृद्धी वाकळे, आर.डी. चौधरी, दशरथ हासे, बाबा शेख आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना कॉ. भस्मे म्हणाले की, देशातील सहकार चळवळ मोडून टाकून सर्व कारभार भांडवलदारांच्या हातात देण्याचे केंद्रातील सरकारचे प्रयत्न जोरदारपणे सुरू आहेत. सहकारातील काळा कारभार सुधारलाच पाहिजे, घराणेशाही थांबलीच पाहिजे, भ्रष्टाचार संपलाच पाहिजे. परंतु त्याचबरोबर सहकार व सार्वजनिक क्षेत्र टिकलेही पाहिजे. सहकार मोडून खाजगीकरण झाल्यास सर्वसामान्य माणसास तसेच शेतकरी, कामगारांस खाजगी भांडवलदार दारात उभे करणार नसल्याची भिती त्यांनी व्यक्त केली. सहकारात वाईट प्रवृत्ती आहेत. त्यांना दुरूस्त केले जाऊ शकते, पण सहकारी संस्था मोडून कारभार खाजगी हातात गेल्यास मक्तेदारी निर्माण होते. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात नफेखोरी व सामान्यांचे शोषण होत असते. ते थांबवायचे असल्यास सहकार वाचविलाच पाहिजे. सहकारातील लोकांना सोबत घेऊन यासाठी मोठे आंदोलन उभे करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रश्नासंदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी सहकार वाचवा परिषदा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. अहमदनगर जिल्हा सहकारातील अग्रेसर जिल्हा असून महाराष्ट्राला आणि देशाला मार्गदर्शन करणारा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सहकारात काम करणार्या सहकार टिकला पाहिजे अशी भूमिका असणार्या सर्वांना बरोबर घेऊन सहकार वाचवा परिषद भरवली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी कॉ. भस्मे यांनी अहमदनगर जिल्ह्यात कोरोना काळातही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी, कामगार व विविध जनविभाच्या प्रश्नावर सतत आंदोलने करून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न व मागण्या ऐरणीवर आणून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करुन न्याय मिळवून दिल्याचे कौतुक केले. शेतकरी कामगार, सर्वसामान्य माणसांचे जीवनमान सुधारण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या विविध जनसंघटना भक्कम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, ग्रामपंचायत आदी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे लोक निवडून आणण्यासाठी जनतेने भारतीय कम्युनिस्ट पक्षाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.