नागरिकांना घरोघरी सागरगोटा व कवडी देऊन करणार जनजागृती
पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद आणि मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाचा पुढाकार
अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख
शहरात उभारण्यात येत असलेल्या फाईव्ह जी मोबाईल टॉवरमुळे पशु-पक्षी, मनुष्यासह सजीव सृष्टीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याच्या जनजागृतीसाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद आणि मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने नवरात्र उत्सवात नागरिकांना घरोघरी सागरगोटा व कवडी देऊन जनजागृती केली जाणार आहे.
मोबाईल टॉवर उभारणारे कंपनीचे अधिकारी, जागा मालक व त्यांना परवनागी देणार्या अधिकार्यांना सागरगोटाचा चटका देण्यासाठी व आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्यास संबंधितांकडून नुकसान भरपाई म्हणून कवडी देखील मिळणार नसल्याची जाणीव करुन देण्यासाठी ही मोहिम सुरु करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
शहराच्या इतर भागासह विशेषत: धर्माधिकारी मळा परिसरात लोकवस्तीमध्ये फाईव्ह जी मोबाईल टॉवर उभारण्यात येत आहे. या मोबाईल टॉवरने प्रेक्षेपित होणार्या विद्युत चुंबकीय लहरींचा मानवी तसेच सजीवांवर विपरीत परिणाम होतो ही बाब संशोधनाने सिध्द झाली आहे. मोबाईल टॉवरबद्दल नागरिकांमध्ये जागृती नसून, ते उदासीन असल्याने मोबाईल टॉवर उभारणारे लोककर्कासूर याचा फायदा घेत आहे.
लोकवस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात फाईव्ह जी मोबाईल टॉवर उभारण्यात येत असल्याने त्याच्या विद्युत चुंबकीय लहरींमुळे भविष्यात नागरिकांना ब्रेन कॅन्सर, ब्रेन ट्यूमर आणि झोपमोडच्या समस्यांना सामोरे जावे लागणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
मोबाईल कंपन्या व जागा मालक मोबाईल टॉवरच्या रुपाने पैसे कमविण्याचे झाड लावत असून, नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत नाही.
लोकवस्तीमध्ये फाईव्ह जी मोबाईल टॉवर विरोधात मोठे जन आंदोलन उभारण्यासाठी संघटनेने जनजागृती सुरु केली आहे. याचा भाग म्हणून मोबाईल टॉवर उभारणार्यांना लोककर्कासूर घोषित करुन त्यांना सागर गोट्याचा चटका देण्यासाठीचे आंदोलन केले जाणार. तर लोकहितार्थ हे आंदोलन चालू राहणार असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.
या आंदोलनासाठी अॅड. गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, ज्ञानदेव काळे, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम आदी प्रयत्नशील आहेत.