नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणूकीत ॲड. संदिप गुळवे यांना ‘ इब्टा’ चा जाहीर पाठिंबा
अहमदनगर : २६ जून रोजी होणाऱ्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. संदीप गोपाळराव गुळवे (पाटील) यांना आदर्श बहुजन शिक्षक संघ ( इब्टा ) ने जाहिर पाठिंबा दिला आहे.संघटनेचा पाठिंबा मिळण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे यांनी संघटनेस लेखी पत्र देवून शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर प्रत्यक्ष चर्चा केली. शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले. गेल्या अनेक वर्षा पासून महाराष्ट्रात शिक्षक भरती प्रक्रिया बंद असल्यामुळे हजारो शिक्षक पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.
विनाअनुदानीत तत्वामुळे शिक्षकांना योग्य मोबदला मिळत नाही त्यामुळे शिक्षकी पेशाचे अवमूल्यन होत आहे. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करून चातुर्वण्य व्यवस्थेला खतपाणी घालण्याचे षडयंत्र रचले जात आहे. हि गंभीर बाब आहे. नविन शैक्षाणिक धोरणात अनेक बदल करून सर्व सामान्यांना न परवडणारे महागडे शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बहुजन समाज शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकला जात आहे. वास्ताविक पाहाता शिक्षण हा मूलभूत हक्क असतांना सर्व सामान्यांना शिक्षण नाकारले जात आहे. शिक्षणाचे कंत्राटीकरण व खाजगीकरण करून सरकारी शाळा भांडवलदाराच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. आमदार खासदाराना पेन्शन योजना लागू आहे मात्र देशाला घडविणाऱ्या शिक्षकांना पेन्शन नाकारली जात आहे . या निवडणूकीत काही उमेदवार शिक्षकांना विविध प्रलोभने दाखवून शिक्षण क्षेत्रात वाईट पायंडा पाडला जात आहे .
या निवडणुकीतील एका उमेदवाराने मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेल्या प्रचार सभेत बोलताना सांगितले की ‘मुख्यमंत्र्यांनी जर शिक्षकांचे प्रश्न सोडविले तर शिक्षक त्यांचे कायमचे गुलाम राहतील’ अशा प्रकारचे शिक्षकांना अपमानीत करणारे वक्तव्य केले आहे. अशा विचारांचे शिक्षक आमदार खरोखर शिक्षकांचे प्रश्न सोडवतील का ? शिक्षण क्षेत्रात अशा विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. शिक्षण व शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यात या सरकारला अपयश आले आहे. म्हणून महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. संदिप गोपाळराव गुळवे (पाटील) यांना राज्य कार्यकारिणीच्या सहविचार सभेत सर्वानुमते पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. या प्रसंगी आदर्श बहुजन शिक्षक संघ ( इब्टा ) चे राज्य महासचिव पी.एस.निकम, माजी अध्यक्ष ज्ञानदेव खराडे, रयत बँक संचालक दिलीप तुपे, जळगाव जिल्हाध्यक्ष आर आर धनगर, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राम जाधव, जिल्हा सचिव आमोद नलगे, उपाध्यक्ष शंकर तातळे आदी उपस्थित होते.