पवन नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार
मुलींचे यश समाजासाठी सकारात्मक गोष्ट – अर्चना काळे
नगर – आज स्पर्धेचे युग असल्याने विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे नियोजन करुन आपले मार्गक्रमण केले पाहिजे. एक-एक मार्काला महत्व आल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे गरजेचे आहे. 10 वी व 12 वी परिक्षेत गेल्या काही वर्षांपासून मुलींचे यशस्वी होण्याची प्रमाण मोठे आहे, ही समाजासाठी सकारात्मक गोष्ट आहे. या गुणवंतांचा सत्कार करुन त्यांच्या शैक्षणिक कार्यास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न पतसंस्थेच्या माध्यमातून केला जात आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांची आर्थिक पत सुधारण्याबरोबरच त्यांच्या गुणवंत पाल्यांना शिक्षण घेतांना अडचण येऊ नये यासाठी मदतीचा हात देण्यात येतो. गुणवंत पाल्य हे पतसंस्थेचा अभिमान आहे, असे प्रतिपादन चेअरमन अर्चना काळे यांनी केले.
पवन नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चेअरमन अर्चना काळे, व्हाईस चेअरमन दत्तात्रय डोळसे, संचालक किरण धारक, मनोज क्षीरसागर, निशिकांत शिंदे, प्रसाद शिंदे, बाळासाहेब हुच्चे, संजय धोकरिया, आशा चौरे, अभय काळे, दिपक भागवत, व्यंकटेश जोशी, कविता डोळसे, अमृता शिंदे आदि उपस्थित होते.
यावेळी कु.ऋचिता सातपुते, सर्वज्ञा डोळसे, कु.सिद्धी शिंदे, श्रावणी डोळसे, सई देवकर, गौरी काळे आदिंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी व्हाईस चेअरमन दत्तात्रय डोळसे म्हणाले, पवन नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून सभासद, कर्जदार, ठेवीदार यांच्या प्रगतीसाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर विविध उपक्रमातून सामाजिक दायित्वही जपले जाते. आज सभासदांच्या गुणवंत पाल्यांनी मिळविलेले यश हे कौतुकास्पद असेच आहे. त्यांचा सत्कार केल्याने इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशिकांत शिंदे यांनी केले तर आभार मनोज क्षीरसागर यांनी मानले.