प्राध्यापक फक्त नोकरीतून निवृत्त होतो पण समाजकारणात अधिक सक्रीय होतो – रामचंद्र दरे
न्यू आर्ट्सचे प्रा. सुधाकर काळे पाटील यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव
32 वर्ष केले राज्यशास्त्र विषयाचे अध्यापन
अहमदनगर (प्रतिनिधी) – शैक्षणिक क्षेत्रातील सेवा संपली म्हणजे माणूस रिटायर होत नाही. शिक्षणाने समाज घडविणारे प्राध्यापक शेवट पर्यंत सामाजिक कार्यात सक्रीय योगदान देत असतात. तळमळीने काम करणारा प्राध्यापक फक्त नोकरीतून निवृत्त होतो व समाजकारणात अधिक सक्रीय होत असल्याची भावना अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांनी व्यक्त केली.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक सुधाकर काळे पाटील यांच्या सेवापूर्तीच्या गौरव सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात दरे बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार ॲड. दिपलक्ष्मी म्हसे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, उपप्राचार्य प्रा. कल्पना दारकुंडे, पर्यवेक्षक प्रा. सुभाष गोरे आदींसह महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी महाविद्यालयाच्या प्रांगणातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सेवापूर्ती निमित्त प्राध्यापक सुधाकर काळे पाटील व सौ. प्रमिलाताई काळे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. प्रा. काळे यांनी 51 हजार रुपयाची देणगी संस्थेसाठी दिली. प्रास्ताविकात उपप्राचार्य प्रा. कल्पना दारकुंडे यांनी 32 वर्ष प्रा. काळे यांनी राज्यशास्त्र या विषयाचे अध्यापन केले. नोकरीची सुरुवात टाकळीमानुर, टाकळी ढोकेश्वर येथून केली. अनेक संघर्षातून वाटचाल करत त्यांनी आपले कार्य सुरु ठेवल्याचे स्पष्ट करुन त्यांच्या सेवा कार्याची माहिती दिली.
ॲड. विश्वासराव आठरे म्हणाले की, संस्थेत प्रा. काळे यांनी उत्तमप्रकारे सेवा दिली. सेवापूर्तीनंतरही ते संस्थेला विसरलेले नाही, त्यांनी संस्थेच्या कार्यासाठी दिलेली देणगी कौतुकास्पद आहे. बिकट परिस्थितीतून आलेल्या काळे यांनी आयुष्यात चटके सोसून स्वत:चे आयुष्य घडवले आणि हाच आदर्श आपल्या विद्यार्थ्यां समोर ठेऊन त्यांनी विद्यार्थी घडविल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. दीपलक्ष्मी म्हसे म्हणाल्या की, काळे सर आणि मी एकाच भूमीतून आलेलो आहोत. शेतकरी पुत्र असल्याने त्यांच्या जीवनावर एक पुस्तक लिहण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.वकाळे सर लवकरच आपल आत्मचरित्र ग्रंथ प्रकाशित करतील. संजय जाजगे यांनी विनोदी व शिस्तप्रिय स्वभाव असलेले प्रा. काळे यांचा सुरवातीचा काळ संघर्षात गेला. आपल्याला आवड असलेल्या क्षेत्रात काम केल्यास कोणताही ताण-तणाव येत नसल्याचे त्यांच्यावरुन स्पष्ट होत असल्याचे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना सुधाकर काळे म्हणाले की, जगात ज्ञानासारखे पवित्र काहीच नाही. संघर्ष करुन शिक्षण घेतले व प्राध्यापक होऊन आवड असलेले विद्या दानाचे कार्य केले. या क्षेत्रात काम करताना अनेक चांगले विद्यार्थी घडविल्याचे समाधान असल्याचे स्पष्ट करुन भविष्यात चांगल्या प्रकारे शेती करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र जाधव यांनी केले. आभार प्रा. प्रतिभा पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. गणेश भगत, डॉ. दत्तात्रय नकुलवाड, प्रा. नितीन पानसरे, प्रा. सिता काळे, प्रा. स्मिता मेढे आदींनी परिश्रम घेतले.