कृषी उपसंचालक अधिकारी रविंद्र माने यांचे प्रतिपादन,स्नेहबंधतर्फे फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
अहमदनगर प्रतिनिधी – स्नेहबंध फाऊंडेशनने फॅन्सी ड्रेस स्पर्धेच्या माध्यमातून मुलांना आपले कलागुण सादर करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. मुलांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे प्रतिपादन कृषी उपसंचालक अधिकारी रविंद्र माने यांनी केले.
कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत.कोरोना संकट काळात विद्यार्थ्यांना आपले कला गुण सादर करता येत नव्हते.त्यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांना व्यासपीठ मिळावे यासाठी स्नेहबंध फाउंडेशनने ऑनलाइन फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय येथे कृषी उपसंचालक अधिकारी माने यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले,त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी विलास नलगे,स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे, सचिन पेंडुरकर, संकेत शेलार आदी उपस्थित होते.
स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे शाळा बंद आहेत. मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे.मात्र इतर सर्व उपक्रम बंद आहेत.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. त्यांना विरंगुळा हवा, त्यांच्यात उत्साह यावा यासाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेला शहरातून मोठ्या संख्येने मुलांनी प्रतिसाद दिला होता. पालकांनीही मोठ्या उत्साहाने मुलांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले.त्याबद्दल त्यांचे आभार.
विजेत्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.