अशोक सहकारी बँकेच्या कर्ज वितरणाची चौकशी करण्याची मागणी
बँकेचे सीईओ, व्यवस्थापक व इतर दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी; चक्क अर्बन बँकेतील बोगस कर्ज प्रकरणातील आरोपीलाही कोट्यावधीचे कर्ज दिल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांच्या असणाऱ्या ठेवीच्या रकमा अशोक सहकारी बँकेत बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याजात असल्याचा आरोप करुन याप्रकरणी चौकशी करुन तातडीने बँकेचे सीईओ, व्यवस्थापक व इतर दोषींवर गुन्हे दाखल करण्याची तक्रार रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. या बँकेतून अर्बन बँकेतील बोगस कर्ज प्रकरणातील आरोपीला देखील कर्ज वितरीत करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, याप्रकरणी कारवाई न झाल्यास संघटनेचे जिल्हा संघटक मेहर कांबळे यांनी स्वातंत्र्य दिनी (दि.15 ऑगस्ट) जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
अशोक सहकारी बँकेत सर्वसामान्य नागरिकांचे ठेवी आहेत. कष्टाने कमवलेले पैसे सुरक्षित असावे व त्यावर काही व्याज मिळण्याच्या उद्देशाने नागरिकांनी बँकेत ठेवी ठेवल्या आहेत. पण बँकेचे सीईओ, व्यवस्थापक व इतर संबंधित कर्मचारी टक्केवारी घेऊन बनावट कागदपत्रांच्या आधारे नागरिकांचा असणारा पैसा कर्ज रुपाने वाटप करत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
अशोक सहकारी बँकेने रोड वाइंडिंग मध्ये गेलेल्या जमीनीवर नगर अर्बन बँकेत बोगस कर्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या प्रवीण लहारे याला कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले आहे. अशाप्रकारे अशोक सहकारी बँकेत अनेक लोकांना बेकायदेशीर रित्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप झाले असून, कर्जदारांकडून टक्केवारी घेऊन जनतेचे पैशांची लूट सुरु असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
याप्रकरणी त्वरीत चौकशी करुन बँकेचे सीईओ, व्यवस्थापक व इतर दोषींवर बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याबद्दल भारतीय न्याय संहिता कलम 61, 323, 335, 336 344 व एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.