भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या दहावी-बारावीच्या गुणवंतांचा सन्मान

- Advertisement -

भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या दहावी-बारावीच्या गुणवंतांचा सन्मान

रात्रशाळेतील राज्याच्या गुणवत्ता यादीत तीन विद्यार्थी चमकले; रूपाली बिल्ला राज्यात प्रथम

परिस्थितीवर मात करुन रात्रशाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश प्रेरणादायी -डॉ. पारस कोठारी

अहमदनगर (प्रतिनिधी)- हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूल मधील राज्याच्या व विद्यालयाच्या गुणवत्ता यादीत चमकलेल्या दहावी व बारावी बोर्डातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. दिवसा अर्थार्जन करुन रात्री शिक्षण घेणारे विद्यार्थी आपल्या गुणवत्तेने चमकले असून, परिस्थितीवर मात करुन त्यांनी मिळवलेल्या यशाचे संस्थेच्या वतीने कौतुक करण्यात आले.

हिंद सेवा मंडळाचे मार्गदर्शक अजितशेठ बोरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी भाई सथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ. पारस कोठारी, उत्तर महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे जॉइंट सेक्रेटरी तथा माजी विद्यार्थी आनंद लहामगे, प्राचार्य सुनिल सुसरे, राहुल मिश्रा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. पारस कोठारी म्हणाले की, जीवनात जिद्द व परिश्रम करण्याची तयारी ठेवा, यश नक्की मिळणार. बिकट परिस्थितीवर मात करून नाईट शाळेचे विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली असून, त्यांनी मिळवलेले यश प्रेरणादायी आहे. राज्यातील रात्र प्रशालेच्या गुणवत्ता यादीतही अव्वल येण्याचा बहुमान शालेय विद्यार्थ्यांनी मिळवलेला आहे. समाजात देखील नाईट स्कूलचे माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश प्राप्त करत आहे.

महाराष्ट्रातील मराठी माध्यमातील सर्वात मोठी रात्रप्रशाळा म्हणून या शाळेने मासूम संस्थेच्या मूल्यांकनात प्रथम स्थान मिळविले असून, अद्यावत शिक्षण व उच्चशिक्षित शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. शिक्षणापासून दुरावलेल्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणदूत ही योजना राबवून अर्धवट शिक्षण सोडलेल्यांना पुन्हा रात्र शाळेत शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अजितशेठ बोरा यांनी नाईट स्कूलचा सर्वात चांगला निकाल लागलेला आहे. होतकरू विद्यार्थी यांनी मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. दिवसा अर्थार्जन करून रात्री शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे हे यश कौतुकास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आनंद लहामगे म्हणाले की, परिस्थितीने खचलेल्या विद्यार्थ्यांच्या पंखात बळ निर्माण करण्याचे काम भाई सथ्था नाईट हायस्कूल करीत आहे. विद्यार्थ्यांना घडवून जीवनात उभे करण्याचे काम रात्र प्रशाळेने केलेले आहे. रात्र प्रशाळेत अनेक सुधारणा झाल्या असून, अनेक सोयी-सुविधा उपलब्ध झालेले आहेत. शिक्षक देखील विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून त्यांना योग्य मार्ग दाखवित असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गुणवंत विद्यार्थिनीनी मनोगत व्यक्त करून नाईट स्कूलमध्ये शिक्षणासाठी आत्मविश्‍वास मिळाल्याने भविष्यात उच्च शिक्षित होण्याचा मानस व्यक्त केला.

मासूम संस्थेच्या वतीने दहावी बोर्डाच्या राज्यातील रात्रशाळेतील दहा विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येते. यामध्ये भाई सथ्था रात्रशाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी पहिल्या दहा मध्ये येण्याचा बहुमान मिळवला आहे. इयत्ता दहावी बोर्डात रात्र प्रशालेमध्ये रूपाली बिल्ला या राज्यात व शाळेत प्रथम आल्या. तर शारदा मंगलपेल्ली  राज्यात चौथ्या व शाळेत द्वितीय येण्याचा मान मिळवला. चेतन घोडके राज्यात पाचवा तर रात्र शाळेत तृतीय आला. इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेत कला शाखा प्रथम- बबिता साळवे, द्वितीय- रिमा मंगलारप, तृतीय- मोहिनी काळे, वाणिज्य शाखा प्रथम- उषा कर्डिले, द्वितीय- गुंफा जावळे, तृतीय- विशाल चित्रावकर या गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थ्यांचे मासूम संस्थेच्या संचालिका निकिता केतकर, एस.एस.सी. प्रमुख शशिकांत गवस, गुरुप्रसाद पाटील, संदीप सूर्यवंशी, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, कार्याध्यक्ष अनंद फडणीस, मानद सचिव संजय जोशी आदी संचालकांनी अभिनंदन करुन चेअरमन, विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवप्रसाद शिंदे यांनी केले. आभार गजेंद्र गाडगीळ यांनी मानले. यावेळी अमोल कदम, महादेव राऊत, उज्वला साठे, वैशाली दुराफे, वृषाली साताळकर, संदेश पिपाडा, शरद पवार, मंगेश भुते, कैलास करांडे, प्रशांत शिंदे, अशोक शिंदे, स्वाती होले, ओंकार भिंगारदिवे, संदीप कुलकर्णी, अनिरुद्ध देशमुख, अनिरुद्ध कुलकर्णी, अविनाश गवळी, मनोज कोंडेजकर, कैलास बालटे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles