एकाच डॉक्टरवर भिंगारकरांची आरोग्य यंत्रणा विसंबून
भिंगार राष्ट्रवादीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन
रिक्त असलेल्या डॉक्टरांची नेमणुक करुन कर्मचार्यांचे संख्याबळ वाढविण्याची मागणी
अहमदनगर(प्रतिनिधी)- भिंगार शहरातील नागरिकांना आरोग्यसुविधा मिळण्यासाठी छावणी परिषदेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलची आरोग्य यंत्रणा सक्षम करावी व तातडीने रिक्त असलेल्या डॉक्टरांची नेमणुक करुन कर्मचार्यांचे संख्याबळ वाढविण्याची मागणी भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी राष्ट्रवादीचे भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, राष्ट्रवादी युवकचे शहर उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे, विशाल बेलपवार, रमेश वराडे, दिपक बडदे, संपत बेरड, बाळासाहेब राठोड, सुंदरराव पाटील, प्रविण फिरोदिया, केशव रासकर, सर्वेश सपकाळ, संजय खताडे आदी उपस्थित होते.
छावणी परिषदेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दोनच डॉक्टरांवर आरोग्य यंत्रणेचा कार्यभार सुरु होता.त्यापैकी एक डॉक्टर आजारी पडल्याने एकच डॉक्टरवर भिंगारकरांचे आरोग्य यंत्रणा विसंबून राहिली आहे.
तसेच हॉस्पिटलमध्ये परिचारिक व इतर कर्मचार्यांचे मनुष्यबळ कमी असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविध मिळण्यास अडचण येत आहे.
नुकतेच कोरोनाचा नवीन प्रकार आलेल्या ओमायक्रॉनचा धसका भारतासह महाराष्ट्राने देखील घेतला आहे.सर्वच जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सज्ज होत असताना, भिंगारमध्ये छावणी परिषदेच्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य यंत्रणा ढासाळल्याचे चित्र आहे.
पहिल्या लाटेत हॉस्पिटलची जी परिस्थिती होती, ती परिस्थिती दुसर्या लाटेत देखील सुधारलेली नाही. ओमायक्रॉनच्या माध्यमातून तिसरी लाट निर्माण होण्याची भिती असताना तातडीने छावणी परिषदेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलची आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यासाठी रिक्त असलेल्या डॉक्टरांची नेमणुक करुन कर्मचार्यांचे संख्याबळ वाढविण्याची मागणी भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे.
अन्यथा आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलच्या डॉक्टर व मनुष्यबळ वाढविण्याबाबत अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला असून, लवकरच रिक्त जागांवर डॉक्टरांची नेमणुक करुन संख्याबळ वाढणार आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना करण्यात आले असल्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.