जिल्हा मराठा पतसंस्थेच्यावतीने महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
महात्मा ज्योतीबा फुले यांची ग्रंथ संपदा आजही दिशादर्शक व प्रेरणादायी – सतीश इंगळे
नगर – ’शेतकर्यांचे आसूड’ हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारीविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून सार्वजनिक शिवजयंती उत्सवाची सुरुवात करुन युवकांना एकत्र केले. समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी जोतिबांनी लिहिलेले ग्रंथ आजच्या काळातही दिशादर्शक व प्रेरणादायी ठरत आहे. मराठा पतसंस्थेच्या माध्यमातून थोर समाजसेवकांचा आदर्श समोर ठेवून विविध उपक्रमातून समाजोन्नत्तीचे काम केले जात आहे, असे प्रतिपादन मराठा पतसंस्थेचे संचालक सतीश इंगळे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्ड येथील शाखेत त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संचालक सतीश इंगळे, बाळकृष्ण काळे, उदय अनभुले, तारकराम झावरे, शिरिष राऊत, अनुपमा सोनाळे, पुष्पा इंगळे, तेजस कासार आदि उपस्थित होते.
याप्रसंगी उदय अनभुले म्हणाले, महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे, हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. त्यात ते यशस्वी झाले आणि शिक्षण समाजाच्या सर्वस्तरापर्यंत पोहचले. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली, असे सांगितले.
प्रास्तविकात बाळाकृष्ण काळे यांनी पतसंस्थेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन अनुपमा सोनाळे यांनी केले तर तारकराम झावरे यांनी आभार मानले.