माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार यांचा आयुक्तांना संतप्त सवाल.
अहमदनगर प्रतिनिधी – विजय मते
सावेडी उपनगरात गेल्या ४ ते ५ दिवसांपासून घंटा गाड्या बंद झाल्या असून, ऐन नवरात्रौत्सवाच्या काळात रस्त्यावर कचर्यांचे ढिग झाले आहेत. घंटा गाड्यात कचरा टाकणारे नागरिक गाडी येईल मग कचरा टाकू असा विचार करुन दारात कचरा गोळा करुन वाट पाहत आहेत, पण गाड्याच बंद झाल्याने कचरा टाकणार कोठे? अशी अवस्था उपनगरात झाली असल्याने माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार यांनी मनपा आयुक्तांना जाब विचारण्यासाठी कार्यालयात आले असता महानगरपालिका आवारातच कचर्याचे साम्राज्य त्यांना दिसले.
याबाबत संतप्त झालेले निखिल वारे व बाळासाहेब पवार यांनी आयुक्त शंकर गोरे यांना वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी बाहेर चला, असे सुचविले.उपायुक्त श्रीनिवास कुर्हे यांनी तातडीने पाहणी केली, तेव्हा त्यांना परिस्थितीची जाणिव झाली.
इमारतीजवळच ही परिस्थिती आहे तर सावेडी उपनगरात काय अवस्था असेल हे त्यांनी बोलून दाखविले. या बाबत संबंधित जबाबदार अधिकार्यांना जाब विचारावा, अशी मागणी निखिल वारे, बाळासाहेब पवार यांनी आयुक्तांकडे केली.
शहरातील खड्ड्यांचा विषय गाजत असतांनाच कचर्याचा, अस्वच्छतेचा प्रश्न श्री.वारे, श्री.पवार यांनी आज लावून धरला. याबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी केली.
आयुक्त गोरे यांनी याबाबत चौकशी करुन संबंधित जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची ग्वाही दिली व आरोग्य अधिकार्यांशी तातडीने चर्चा करुन माहिती घेवून सावेडी उपनगरात तात्काळ घंटा गाड्या सुरु करण्याचे आदेश देतो, असे स्पष्ट केले.
नागरिकांच्या प्रश्नांसाठी आम्ही संतप्त होतो, म्हणजे आमचा अधिकार्यांवर राग आहे, असे नसते, पण कामे करतांना अधिकारी जबाबदारी झटकतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणिव करुन देण्यासाठी आमचा संयम सुटतो, अशी प्रतिक्रिया निखिल वारे यांनी यावेळी व्यक्त केली.