महावितरण समोरील रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा काँग्रेसचे आंदोलन : किरण काळे  

महावितरण समोरील रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा काँग्रेसचे आंदोलन : किरण काळे  

मनपाचे पंधरा दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन

प्रतिनिधी : नगर कॉलेज जवळ असणाऱ्या महावितरणच्या कार्यालयासमोरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. हॉटेल फरहत ते बागवान कब्रस्तान पर्यंतच्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाला मंजुरी असताना देखील संबंधित ठेकेदाराने केवळ हॉटेल राजश्री पासून काही मीटर पुढ पर्यंतचेच काम पूर्ण केले असून महावितरण कार्यालया पासून ते कब्रस्तान पर्यंतचा रस्ता मागील सुमारे वर्षभरापासून रखडवल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर कामाची प्रत्यक्ष पाहणी करत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपा अभियंता निंबाळकर यांच्याशी संपर्क साधत रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा. अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
परिसरातील नागरिकांनी शहर काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला यांच्याशी याबाबत संपर्क साधला होता. त्यानंतर अर्धवट सोडण्यात आलेल्या कामाची काळे यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. यावेळी संतप्त झालेल्या काळे यांनी अभियंता निंबाळकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. त्यानंतर निंबाळकर यांनी पंधरा दिवसांच्या आत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
याबाबत बोलताना किरण काळे म्हणाले, रस्त्याचे काम मंजूर असताना देखील मागील एक वर्षापासून काम अपूर्ण ठेवण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे केलेल्या अर्धवट कामाचे काही बिल ठेकेदाराला अदा देखील करण्यात आले आहे. महावितरण सारख्या अत्यंत रहदारीच्या आणि सामान्य नागरिकांची मोठ्या संख्येने दररोज ये – जा असणाऱ्या कार्यालयाच्या समोरच मोठमोठे खड्डे आहेत. जवळच असणाऱ्या बागवान कब्रस्तान येथे अंत्यविधीसाठी दुःखांकित कुटुंबीय येत असतात. त्यांना रस्त्याला चालणे देखील शक्य होत नाही. त्यातच पावसाळा सुरू झाल्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून सर्वत्र चिखल झाला आहे. त्यामुळे अनेक वाहन चालक गाडी घसरून पडत असून अपघातग्रस्त होत आहेत. तरी सुद्धा बांधकाम विभागाला जाग येत नाही. आश्वासन पूर्ती न केल्यास कुंभकर्ण निद्रेत असणाऱ्या मनपाला जागे करण्यासाठी काँग्रेस तीव्र आंदोलन छडेल असा इशारा काळे यांनी दिला आहे.
उपाध्यक्ष अलतमश जरीवाला म्हणाले की, स्थानिक नागरिकांनी मनपाकडे अनेक वेळा कामाच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा केला. मात्र मनपाने त्यांना दाद दिली नाही. नागरिकांनी काँग्रेसशी संपर्क केल्यानंतर आम्ही मनपाला याबाबत इशारा दिला आहे. ठेकेदार अर्धवट काम सोडून वर्षभरापासून गायब आहे. अजून मधून केव्हातरी किरकोळ डागडुजी करून नागरिकांची बोळवण केली जात आहे. महावितरण आणि कब्रस्तान या मार्गावर असून गैरसोय होत असल्यामुळे नागरिकांच्या संतापाचा आता उद्रेक झाला आहे. तातडीने काम पूर्ण करावे. अन्यथा काँग्रेस आक्रमक पाऊल उचलल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा जरीवाला यांनी दिला आहे.
यावेळी हाजी शहबाज सय्यद, तौसिफ शेख, किशोर कोतकर, आफताब बागवान, विकास भिंगारदिवे, जवाद बागवान, अझहर खान, मयूर भिंगारदिवे, मोसिन कुरेशी, सोहेल बागवान, अशोक साबळे, शोएब तांबोळी, स्वप्निल पाठक, हुजैफ तांबोळी, वसीम शेख, राजू शेख, सहील शेख, जयराम काकडे आदींसह नागरिक उपस्थित होते.
तोपर्यंत बिल अदा करू नका : काळे 
केलेल्या अर्धवट कामाचे बिल घेऊन संबंधित ठेकेदार गायब झाला आहे. काम पूर्ण होण्यापूर्वीच बिलाची काही रक्कम मिळाल्यामुळे ठेकेदार वारंवार अशा पद्धतीने अर्धवट कामे सोडून गायब होतात. अशी अनेक उदाहरणे यापूर्वी देखील मनपात समोर आली आहेत. मुळात बांधकाम विभाग काम पूर्ण झाल्याशिवाय ठेकेदारांना बिल अदा करतेच का ? यावर काळे यांनी निंबाळकर यांच्याकडे तीव्र आक्षेप नोंदवत जोपर्यंत काम शत प्रतिशत पूर्ण होत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदारला दमडी देखील देऊ नये, असे सुनावले आहे. सोमवारी याबाबत लेखी तक्रार मनपात दाखल करणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles