प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल चूकीचे व आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद; मुस्लिम समाजबांधव उतरले रस्त्यावर
महंत रामगिरी महाराज यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्य दिनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रवचनात ईस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन चरित्रावर चूकीचे व आक्षेपार्ह वक्तव्य करुन मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सरला बेटचे महंत रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चा काढून डीएसपी चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. महंत रामगिरी महाराजांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध नोंदवून जोरदार निदर्शने करण्यात आली. या मोर्चात मुस्लिम समाजबांधवांसह युवक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.
शुक्रवारी (दि.16 ऑगस्ट) दुपारच्या नमाज पठणनंतर शहरातील मुस्लिम समाज बांधव कोठला येथे दुपारी 3 वाजता मोठ्या संख्येने जमले होते. ईस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन चरित्रावर चूकीचे व आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ कोठला येथून मुस्लिम समाजाच्या मोर्चाला प्रारंभ झाले. यामध्ये युवकांनी हातात काळे झेंडे घेऊन व हातावर, डोक्यावर काळ्या पट्ट्या बांधून मोर्चात सहभाग नोंदवला. नगर-संभाजीनगर मार्गे मोर्चा डीएसपी चौकात आला असता, युवकांनी ठिय्या देत चक्का जाम आंदोलन केले. संतप्त युवकांनी जोरदार घोषणाबाजी करुन सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.
रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज रा. सरला बेट, ता. वैजापूर छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) यांनी मौजे पंचाळे तालुका सिन्नर जि. नाशिक येथे स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट रोजी अखंड हरिनाम सप्ताहाच्या जाहीर प्रवचनात सर्व लोकांसमक्ष व लाईव्ह प्रक्षेपण सुरू असताना ईस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन चरित्रावर चूकीचे व आक्षेपार्ह वक्तव्य करुन मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने समस्त मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेले आहेत.
राज्यातील मुस्लिम समाज बांधव सर्व धर्माचा आदर व सन्मान करत आला आहे व करत आहे. मात्र काही महाराज व राजकीय नेते मंडळी वारंवार ईस्लाम धर्माबाबत चुकीची माहिती देऊन इतर समाजात मुस्लिम द्वेष कसा वाढेल यासाठी प्रवचन व भाषणामध्ये मुस्लिम समाजाला टार्गेट करून व चुकीचा संदेश देऊन समाजात द्वेष पसरवित आहे. पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने ते वारंवार भडकाऊ भाषण देऊन ते जातीय तणाव निर्माण करण्याचे काम करत आहे. यामुळे नागरिक रस्त्यावर उतरु लागले असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असून, याला प्रशासन जबाबदार आहे.
रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा संपूर्ण मुस्लिम समाज निषेध करत आहे. धार्मिक प्रवचनात इतर धर्मांचा अपप्रचार करणे हे अयोग्य व भावना दुखावणारे आहे. स्वातंत्र्य दिनी प्रवचनातून सदर महाराजांनी संविधान आणि लोकशाहीवर आघात करणारे कृत्य केले आहे. महिलांवर होणारे अत्याचार हे सर्वच समाजातील गंभीर प्रश्न असून, या अत्याचाराला एखाद्या धर्माचा रंग देणे, अयोग्य आहे. महिलांवरील अत्याचार करणारे आरोपी हे विविध जाती-धर्मातील असून, त्यांना एकाच जातीचा लेबल लावण्याचे काम या महाराजांनी केला आहे. रामगिरी महाराज आपल्या प्रवचनातून नागरिकांच्या भावना भडकाविण्याचे व समाजात द्वेष पसरवण्याचे काम करत आहे. हा प्रकार निंदनीय व लोकशाहीला काळिमा फासणारा असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
आंदोलन दरम्यान मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळ निवेदन देण्यास गेले असता, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती स्वत: डीएसपी चौकात आंदोलन स्थळी येऊन मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्विकारुन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. आंदोलकांनी यावेळी सदर महाराजांना अटक करण्याची व धार्मिक द्वेष पसरविण्याच्या उद्देशाने भडकाऊ भाषण देणाऱ्या महाराजांच्या प्रवचनांवर बंदी आणण्याची मागणी केली. पोलीस उपाधीक्षक भारती यांनी सदर घटनेप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन देऊन रस्ता मोकळा करण्याची विनंती केली.
आक्रमक झालेल्या युवकांनी महाराजांच्या अटकेची मागणी लाऊन धरली होती. 20 मिनीट चाललेल्या या चक्का जाम आंदोलनाने नगर-संभाजीनगर, तारकपूर रस्ता व न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुक खोलंबली होती. मुस्लिम समाजाने चक्का जाम आंदोलन मागे घेतल्यानंतर पोलीसांनी रस्ता रहदारीस मोकळा करुन दिला. यावेळी मुस्लिम युवकांनी देखील रस्त्यावरील ट्रॅफिक सुरळीत करण्यास पोलीस प्रशासनाला सहकार्य केले.