- Advertisement -
मोहरम मिरवणूक मार्गावरील रस्ते दुरुस्त करून तातडीने बंद पडलेले पथदिवे सुरू करा – किरण काळे
काँग्रेसच्या मागणीनंतर मनपाची तयारी सुरू
प्रतिनिधी : अनेक वर्षांची परंपरा असणारा ऐतिहासिक मोहरम उत्सव लवकरच सुरु होणार आहे. मोहरम मध्ये पूर्ण राज्याचे व देशाचे भाविक शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात. हिंदू – मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून याकडे पाहिले जाते. भाविकांची मोठी गर्दी यावेळी असते. मात्र या मार्गावरील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे मोहरम मिरवणूक मार्गाच्या रस्ते व पथदिवे तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना शहर काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला म्हणाले की, याबाबतच्या मागणीचे लेखी निवेदन दि. २६ जून रोजीच मनपाला देण्यात आले होते. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अवलोकनार्थ निवेदनातील मागणीच्या अनुषंगाने प्रस्ताव ठेवण्याच्या सूचना कनिष्ठ अधिकाऱ्यांना करण्यात आल्या होत्या. लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. यामुळे मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर होणारा आहे.
अल्पसंख्यांक काँग्रेस आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला म्हणाले की, खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार होते. तेव्हापासून त्याकरिता पाठपुरावा सुरू होता. मात्र राज्यात सत्ता पालट झाला. सदर काम रखडलेले आहे. ते आज पूर्ण झालेले असते तर भाविकांची गैरसोय झाली नसते. त्यामुळे काँग्रेसने याबाबतीत आक्रमक पाऊल उचलत मनपा प्रशासनाकडे मागणी केली आहे. शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था खूप वाईट झालेली आहे. तसेच मोहरम मिरवणुकीच्या मार्गावरील बहुतेक भागातील पथदिवे बंद आहे. ते देखील तातडीने सुरू करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
- Advertisement -