राजकारणात जय, पराजय होत असतो, दोन्हीही पचविण्याची ताकद असावी लागते – किरण काळे
ॲड. राहुल झावरे यांच्यावर झालेला हल्ला भ्याड प्रकाराचा, विरोधकांनी पराभव स्वीकारला पाहिजे – किरण काळे
प्रतिनिधी : महाविकास आघाडीचे ॲड. राहुल झावरे यांच्यावर गुरुवारी हल्ला झाला. या हल्ल्याची शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी भ्याड हल्ला अशी भलावना करत निषेध केला आहे. राजकारणात जय, पराजय होत असतो. दोन्हीही पचविण्याची ताकद असावी लागते. विजयानं उन्मादून जायचं नसतं आणि पराजयान खचून जायचं नसतं. विरोधकांनी आता पराजय स्वीकारला पाहिजे असे काळे म्हणाले. काळे यांनी त्यांची खासदार निलेश लंके यांच्या समवेत सुरभी हॉस्पिटल येथे भेट घेत विचारपूस केली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने रुग्णालया बाहेर जमले होते. काळे म्हणाले, नगर शहरासह दक्षिणेत गुन्हेगारी प्रकारांची संख्या वाढत आहे. हे चिंताजनक आहे. यापूर्वी देखील निवडणुकीच्या काळात खुनी हल्ले, हत्याकांड असे गैरप्रकार घडले आहेत. कुठेतरी हे थांबलं पाहिजे. शहरासह जिल्ह्यात सर्वत्र शांतता असली पाहिजे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही पाहिजे. राजकीय लढाई ही वैचारिक स्वरूपाची असली पाहिजे. मुद्द्यांवरून जरूर एकमेकाला प्रश्न विचारले पाहिजेत. पण मुद्द्यांवरून लढाई गुद्द्यांवर घसरणार नाही याची दक्षता घेतली गेली पाहिजे.
मात्र दुर्दैवाने परिस्थिती या विरुद्ध दिसत आहे. माझं राजकारणातील, विशेषत: तरुण सहकाऱ्यांना आवाहन आहे की, आपल्या परिवाराला तसेच समाजाला अभिमान वाटेल असच आपलं नेहमी वर्तन असलं पाहिजे. चुकीच्या पद्धतीने दहशत माजवून क्षणिक आनंद कुणी मिळत असेल तर तो आनंद नसून ती विकृती आहे गुन्हेगारांच्या गैरकृत्त्यांचा मी निषेध करतो, असे काळे यांनी म्हटले आहे.