लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्य व एकाग्रतेसाठी योग आणि ध्यानचे धडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे प्रात्यक्षिकासह शास्त्रोक्त पद्धतीने धडे देऊन त्याचे महत्त्व सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील योगाचे विविध आसने उत्तमपणे सादर केले.
प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके व माध्यमिकच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे यांच्या उपस्थितीत हा योग सोहळा पार पडला. सेवानिवृत्त शिक्षक माणिक दळवी यांनी योगाचे विविध आसने प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांकडून करुन घेतले. तर योगाचे निरोगी आरोग्यासाठी असलेले महत्त्व विशद केले.
शिवाजी लंके म्हणाले की, योगाने जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन दैनंदिन जीवनातील कार्यक्षमता वाढते. विद्यार्थ्यांच्या शारीरिक वाढ, मानसिक एकाग्रतेसाठी योग-प्राणायाम सर्वोत्तम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.छायाताई काकडे यांनी धकाधकीच्या जीवनात मनावरील ताण कमी करण्यासाठी योग व प्राणायाम काळाची गरज बनली असल्याचे सांगितले. माणिक दळवी म्हणाले की, योग व ध्यानने शरीर व मनावर नियंत्रण मिळवता येते. शरीर व मनावर नियंत्रण असल्यास असाध्य गोष्टी सहज करता येऊ शकतात. विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीन प्रगतीसाठी योगाचा दैनंदिन जीवनात समावेश करण्याचे त्यांनी आवाहन केले. अत्यंत सोप्या पध्दतीने योग व प्राणायाम शिकवल्याबद्दल दळवी यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.