अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पर्धेच्या युगात गुणवत्तेशिवाय पर्याय राहिलेला नाही. रयत शिक्षण संस्थेत गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळत असून, सर्वसामान्यांची मुले घडविण्याचे काम लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेने केले असल्याचे प्रतिपादन महापालिकेचे उपमहापौर गणेश भोसले यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेचे कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील प्रज्ञाशोध व स्कॉलशीपच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात उपमहापौर भोसले बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी हमाल पंचायतचे अध्यक्ष तथा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, बापूसाहेब ओव्हळ, रयतचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडूळे, अशोक बाबर, माजी लेखापरीक्षक विश्वासराव काळे, उत्तर विभाग निरीक्षक टी.पी. कन्हेरकर, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके, राजनारायण पांडूळे, अनुसंगम शिंदे आदिंसह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे बोलताना उपमहापौर भोसले म्हणाले की, नवीन तंत्रज्ञानाचा स्विकार करत असताना पर्यावरणाचा समतोल साधणे गरजेचे बनले आहे. मनुष्याला जगण्यासाठी ऑक्सिजन सर्वात गरजेची गोष्ट असून, ऑक्सिजन देणारे झाडे लावण्यासाठी मात्र दुर्लक्ष केले जात आहे. पर्यावरणासाठी काही देणे लागते या भावनेने प्रत्येकाने वृक्षरोपण करुन त्याचे संवर्धन करण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक शिवाजी लंके यांनी शाळेच्या स्थापनेपासून ते सध्याच्या शालेय परिस्थितीचा आढावा घेऊन गुणवत्तेचा वाढता आलेख मांडला. तसेच शहराच्या विविध भागासह इतर गावातील विद्यार्थी देखील या शाळेत शिक्षण घेत असल्याचे स्पष्ट केले. ज्ञानदेव पांडूळे यांनी सर्वसामान्य श्रमिकांची मुले या शाळेत शिक्षण घेत असून, गुणवत्तेच्या बाबतीत ते आघाडीवर असल्याचे सांगितले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते मंथन व गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी, तसेच इयत्ता पाचवी व आठवी मधील स्कॉलरशीप व एनएमएमएस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. शाळेच्या वतीने नूतन उपमहापौर भोसले व स्थायी समितीचे सभापती घुले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. व्होडाफोनची एक लाख रुपयाची शिक्षक शिष्यवृती मिळवणारे प्रशांत खंडागळे, मराठी विषयात पुणे विद्यापिठाची पीएचडी मिळवणारे शिक्षक सुदर्शन धस यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रशांत खंडागळे यांनी शालेय गुणवत्ता कक्षासाठी शाळेला 10 हजार रुपयाची देणगी दिली.
दादाभाऊ कळमकर म्हणाले की, रयतने सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे उघडी करुन दिली. शिक्षण क्षेत्रातील विशिष्ट वर्गाची मक्तेदारी मोडित काढून बहुजनांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आनले. कर्मवीरांनी लावलेल्या रोपटेचे वटवृक्ष बहरले आहे. कर्मवीरांनी कमवा व शिका! हा दिलेला संदेश आजही विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. अविनाश घुले यांनी श्रमिकांच्या मुलांना घडविण्याचे कार्य लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत होत आहे. अनेक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेऊन उच्च पदावर गेली आहेत. जीवन यशस्वी करण्यासाठी गुणवत्तापुर्ण शिक्षणाची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता पिसाळ व प्रदिप पालवे यांनी केले. तसेच सुजाता दोमल व वर्षा धामणे पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन केले.