श्रीगोंदा प्रतिनिधी – गणेश जेवरे
श्रीगोंदा तालुक्यामधील लोणी ग्रामपंचायतमध्ये २०८-१९ व २०१९-२० मध्ये १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून लाखो रुपयांची कामे नियमबाह्य झाली असल्याचे चौकशी अहवालातून समोर आले होते.मात्र त्याबाबत संबधित सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल होत नव्हता.तक्रारकर्ते राजेंद्र काकडे व स्वप्नील लाटे यांनी उपोषण करताच तत्कालीन सरपंच संतोष चंद्रकांत माने,रामदास बबन ठोंबरे व ग्रामविकास अधिकारी रामभाऊ काशिनाथ खामकर या तिघाविरोधात अपहार,फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत मध्ये विविध विकासकामे नियमबाह्य झाली असल्याची तक्रार राजेंद्र काकडे, स्वप्नील लाटे व इतर काही नागरिकांनी तत्कालीन गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्याकडे केली होती या तक्रारीची दखल घेऊन दोन वर्षातील कामाची चौकशी करण्यासाठी एक पथक नियुक्त केले गेले.
या पथकाच्या चौकशीत अनेक कामे नियमबाह्य झाल्याचे उघड झाले. २०१८- १९मध्ये १४ व्या वित्त आयोगामधून २५ हजार रुपये किंमतीचे इन्व्हर्टर नियमबाह्य बसविण्यात आले.ग्रामपंचायतिचे विस्तारीकरण हे काम असताना प्रत्यक्षात मात्र ग्रामपंचायतमधील आतील भागाचे पीओपी करण्यात आले. २०१८-१९ तांत्रिक मंजुरी न घेता ,कामाचे मूल्यांकन न करता स्मशानभूमीचे काम नियमबाह्य करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयाचे विस्तारीकरण काम असताना प्रत्यक्षात लाईटफिटिंग करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात जे फर्निचरचे काम करण्यात आले त्याची निविदा न काढता काम बेकायदा करण्यात आले.
२०१८-१९ मध्ये मूळ आराखड्यानुसार पर्वतवाडी रस्ता व नगर दौंड रस्ता-महादेववाडी रस्ता ही कामे घेण्यात आली होती या कामावर एक लाख पन्नास हजार खर्च करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात ही कामे झालीच नाहीत.गावंतर्गत एलईडी च्या कामासाठी ३ लाख ७९ हजार रुपयांची मंजुरी असताना त्या कामावर ९ लाख ९ हजार रुपये खर्च करण्यात आला त्याच बरोबर इलईडी ची खरेदीही नियमबाहय पद्धतीने करण्यात आली.
२०१९-२० मध्ये २५ टक्के लेखाशीर्षमधून पवारवस्ती जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत बांधण्याच्या कामासाठी तांत्रिक मंजुरी आदेश,अंदाजपत्रक,मूल्यांकन न करता काम पूर्ण करण्यात आले.ग्रामपंचायत सुशोभिकरणासाठी मंजूर रकमेपेक्षा ६८ हजार रुपये अधिकचा खर्च करण्यात आला.ग्रामपंचायत सुशोभीकरण अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामासाठी मंजुरी नसताना ते बसविण्यात आल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले होते.
पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण कामाचा चौकशी अहवाल सादर केला होता. जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते मात्र तरीही गुन्हा दाखल होत नव्हता. याबाबत आज राजेंद्र काकडे,स्वप्नील लाटे व इतर लोकांनी तहसिल कार्यालयासमोर उपोषण केले.उपोषण करताच श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी सारिका हराळ यांच्या फिर्यादीवरून संतोष चंद्रकांत माने, व रामभाऊ काशीनाथ खामकर यांनी संगनमत करून २५ लाख ५६ हजार २५२ रामदास बबन ठोंबरे व रामभाऊ काशीनाथ खामकर यांनी संगनमत करून१ लाख ३२ हजार शंभर असा २६ लाख ८८ हजार ३५२ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित माळी करत आहेत.
या सर्व प्रकरणांमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील एक बडा नेता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण ज्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांची पोलिस विभागाकडून व्यवस्थित चौकशी झाल्यास हा सर्व प्रकार कोणाच्या सांगण्यावरून केला हे उघड होईल आणि सर्व गैरव्यवहार करण्यामागील खरा मास्टरमाइंड जनतेच्या समोर येईल.