वर्चस्व ग्रुप शहरात धार्मिक वारसा जोपासून सामाजिक चळवळ चालवत आहे -आ. संग्राम जगताप
वर्चस्व ग्रुपचा मंगलगेटला भंडारा , श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्चस्व ग्रुप शहरात धार्मिक वारसा जोपासून सामाजिक चळवळ चालवत आहे. ग्रुपच्या युवकांनी हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार करुन मंदिराचे रुप पालटले. धार्मिक परंपरा जोपासत असताना, सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य वर्चस्वने केले असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
वर्चस्व ग्रुपच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगलगेट, वंजार गल्ली येथे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार जगताप बोलत होते. प्रारंभी महाआरती करण्यात आली. तर राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर… या भक्ती गीतामध्ये भाविक तल्लीन झाले होते. उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत वर्चस्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर मुर्तडकर यांनी केले. प्रा. माणिक विधाते यांनी श्री हनुमान जन्मोत्सवाच्या भाविकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी परिसरातील भाविक, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.