शासनाचा वन महोत्सव सुरू
वृक्षप्रेमींसाठी अल्प दरात रोपे उपलब्ध
वन विभागाची माहिती
अहमदनगर : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी
सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यांच्या दुतर्फा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व्हावी या हेतूने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 15 जून ते 30 सप्टेंबर यादरम्यान वन महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली. या महोत्सव कालावधीमध्ये वनविभागाच्या रोपवाटिकांमधून शासन निर्णयानुसार अल्प दरात विविध वृक्ष रोपे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन आवश्यक आहे. त्यासाठी विविध शासकीय विभाग, शाळा – महाविद्यालय तसेच वृक्षप्रेमींनी पुढे यावे याकरिता शासन या महोत्सवाचे आयोजन करीत असते.
अहमदनगर जिल्ह्यात वनविभागाच्या एकूण 19 रोपवाटिका असून त्याद्वारे 14 लाख 67 हजार 650 इतकी रोपे यावर्षी तयार करण्यात आली आहेत यामध्ये तीन फूट उंचीची ६ लाख रोपे तयार आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड होण्याच्या दृष्टीने विविध शासकीय – निमशासकीय यंत्रणा, शाळा – महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, वृक्षप्रेमी संघटना यांनी सक्रिय सहभाग घेऊन पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा व वन महोत्सव यशस्वी करावा असे आवाहन उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी केले आहे.