समाजाला सदवर्तनाची शिकवण देणे गुन्हा आहे काय? – रेव्ह. प्रकाश चक्रनारायण
नेवासा (प्रतिनिधी) – ख्रिस्ती धर्म व धर्मगुरु समाजाला सदवर्तनाची शिकवण देत असताना काही धर्मांध शक्तींकडून त्यांना लक्ष्य केले जात असल्याने हा त्यांचा गुन्हा आहे काय? असा उद्विग्न सवाल नेवासा तालुका पास्टर फेलोशिपचे अध्यक्ष पास्टर प्रकाश चक्रनारायण यांनी उपस्थित केला. समाज, धर्मगुरु तसेच प्रार्थनास्थळांवरील हल्ल्यांच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने नेवासा तहसीलवर काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी ते बोलत होते.
देशाच्या विविध भागांत ख्रिस्ती समाज, धर्मगुरु तसेच प्रार्थनास्थळांवर धर्मांध शक्तींकडून हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडू लागल्याच्या निषेधार्थ नेवासा तालुका सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर गुरुवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. फादर सतिष कदम, जॉन गुलदेवकर, रेव्ह अनिल वंजारे, पास्टर प्रकाश चक्रनारायण, किशोर बोरगे, रेव्हरंट विजय गोरे, जगदीश चक्रनारायण, शमुवेल भिंगारदिवे, संजय पाटोळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सायली दिपक साठे, महाराष्ट्र ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष मार्कस बोर्डे, राष्ट्रीय ख्रिस्ती सेनेचे डॉ. प्रविणराजे शिंदे, सुभाष चक्रनाराण, पप्पु इंगळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.
देशात विविध जाती-धर्माचे लोक त्यांच्या संविधानिक अधिकारानुसार गुण्या गोविंदाने राहात असताना ख्रिस्ती समाज, धर्मगुरु तसेच प्रार्थनास्थळांना लक्ष्य करुन जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या घटनांकडे यावेळी लक्ष्य वेधण्यात आले. छत्तिसगढ राज्यातील नारायणपूर येथे दि.2 जानेवारी 2023 रोजी समाजकंटकांच्या धर्मांध जमावाने ख्रिस्ती प्रार्थनास्थळावर हल्ला करुन मदर मेरी, प्रभू येशू ख्रिस्ताचे फोटो व पुतळ्याची तोडफोड करुन धर्मगुरुंना धमकावण्याची घटना यावेळी कथन करण्यात आली. कंदमाळ येथील जळीताच्या घटनेसह महाराष्ट्रातील यवतमाळ, उमरगा, बुलढाणा, कोल्हापूर, अहमदनगर (ब्राम्हणी), राहुरी, सांगली (आटपाडी), तसेच पुण्याच्या आळंदीतील ख्रिस्ती प्रार्थनास्थळांसह धर्मगुरुंवरील हल्ल्याच्या घटनांचा यावेळी तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. ख्रिस्ती धर्म व धर्मगुरु लोकांना चोरी करु नका, खून करु नका, व्यभिचार करु नका, हे पाप आहे असे सांगून सदवर्तनाची शिकवण देत असतात, लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात, हिंदू मंदीरांप्रमाणे चर्च दार सर्वांसाठी उघडे ठेवले जाते, ख्रिश्चन मिशनरींचे मोठ मोठे धर्मादाय दवाखाने, शाळा अहोरात्र रंजल्या गांजल्यांची सेवा करत असताना त्यांच्या धर्मपरिवर्तनाचा ठपका ठेऊन हल्ला करणे कितपत योग्य आहे? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. धर्मांधांकडून केल्या जात असलेल्या या भ्याड हल्ल्यांचा यावेळी उपस्थितांकडून जाहीर निषेध व्यक्त करुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, छत्तिसगढचे मुख्यमंत्री सुरेशजी वाघेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वाढत्या असहिष्णुतेचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली.
संविधानाची अस्मिता राखून धार्मिक स्वातंत्र्याबरोबरच सर्व धर्म समभावाची जपवणूक करावी, ख्रिस्ती प्रार्थनास्थळे, धर्मगुरु, नन्स, धर्मसेवक यांना संरक्षण पुरवावे, ख्रिस्ती लोकांच्या संरक्षणासाठी अत्याचार प्रतिबंधक कायदा करुन धार्मिक द्वेष पसरविणाऱ्यांना चाप लावावा, धार्मिक हल्ल्यात झालेल्या हानीची नुकसान भरपाई व जखमींना आर्थिक मदत देऊन मयत व्यक्तींच्या कुटुंबाचे पुनर्वसन करुन मदत मिळण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चास तालुक्यातील ख्रिस्ती महिला व पुरुष बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. मोर्चेकऱ्यांच्या वतीने तहसीलदार रुपेशकुमार सुराणा उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके नेवासा पोलीस निरीक्षक विजय करे यांनी निवेदन स्विकारले.