सर्बिया येथे होणाऱ्या वर्ल्ड बुद्धिबळ डेफ चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड
अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा कर्णबधीर बुद्धिबळ खेळाडू देवेंद्र वैद्य याचा सत्कार संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑल इंडिया स्पोर्ट कौन्सिल ऑफ डेफ यांच्या तर्फे बिहार (पटना) येथे दि. १८ ते २२ मार्च दरम्यान २४ वी नॅशनल चेस चॅम्पियन ऑफ फॉर डेफ २०२४ ही स्पर्धा संपन्न झाली. त्या स्पर्धेत विविध राज्यातून १२५ खेळाडू आले होते. त्यामधून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा देवेंद्र वैद्य हा भारतात प्रथम क्रमांक मिळवत तो आता भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. जागतिक ओपन बुद्धिबळ स्पर्धा वर्ल्ड डेफ चेस चॅम्पियनशिप, सर्बिया या देशात बेलग्रेड या शहरात २५ जून ते ६ जुलै २०२४ अखेर संपन्न होणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातून बुद्धिबळा मध्ये जागतिक स्तरावरती अधिकृत भारताचे प्रतिनिधित्व करणारा हा प्रथम खेळाडू आहे. असे सत्कार करताना अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले. शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिल फाउंडेशन ही नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते असे अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी सांगितले.
निवड झाल्याबद्दल देवेंद्र वैद्य याचा सत्कार अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते पुस्तक देऊन करण्यात आला यावेळी संघटनेचे सचिव यशवंत बापट, देवेंद्र ढोकळे, रोहित आडकर, चेतन कड, सुनील गुगळे आदी उपस्थित होते. जागतिक स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे शुभेच्छा देण्यात आल्या व सर्वत्र अभिनंदन होत आहे.