साई मिडास बेकायदेशीर बांधकाम परवानगी :
तात्काळ चौकशी व कारवाईसाठी वाढवला दबाव
अहमदनगर (प्रतिनिधी): झोपडी कॅन्टीन परिसरातील साई मिडास बेकायदा बांधकाम परवानगी प्रकरणी तात्काळ चौकशी करून विनाविलंब कारवाई करावी या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची एकजूट झाली आहे.
या प्रकरणात काँग्रेस नेते दीप चव्हाण यांनी पुणे येथील नगररचना मुख्य संचालक यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल या कार्यालयाने घेतली. तक्रारीतील ग्रीव्हन्स पाहून त्यांनी लगेच नाशिक येथील विभागीय नगर रचना कार्यालयाच्या उप संचालकांना पत्र लिहीले .
नगरचे मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालावे, रीतसर चौकशी करावी. या साई मिडास बांधकाम परवानगीची धारिका स्वतः तपासावी.नगर रचना कार रा. ल. चारठाणकर यांच्याकडून अहवाल घ्यावा.
यात जर काही बेकायदेशीर झाले असेल.खोटी कागदपत्रे दिली असतील तर तात्काळ फौजदारी कारवाई करावी असे या आदेशात नमूद करण्यात आले होते. याचे पत्र दीप चव्हाण यांना मिळाले.
याबाबतचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर या बेकायदेशीर बांधकाम प्रकरणाची नगर शहरात चर्चा झाली. सर्व पक्षीय नेते मंडळी जागृत झाले. त्यांची बैठक झाली. पालिका स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी पडत असेल.
मनपाला धडधडीत खोट्या पावत्या दाखवून फक्त २० टक्के रक्कम भरून ६ कोटी रुपयांचा चुना लावला जात असेल, या फसवणुकीने मनपाचे पर्यायाने नगरकरांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असेल, तर हे खपवून घेतले जाणार नाही.
यासाठी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंत लोढा. काँग्रेस नेते दीप चव्हाण, शिवसेना शिंदे गटाचे शहर जिल्हा प्रमुख दिलीप सातपुते, शहर शिवसेना उबाठा गट प्रमुख शंभाजी कदम, प्रथम महापौर, भगवान फुलसौंदर, सोमनाथ चिंतामणी, संजय वल्लाकट्टी, उबाठा गट माथाडी कामगार सेना शहर अध्यक्ष गौरव ढोणे बाबासाहेब गिरवले आदींनी तात्काळ मनपा आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेतली.
त्यांना पुणे येथील राज्य नगर रचना विभागाचे प्रभारी मुख्य प्रशासकीय अधिकारी मुख्य संचालक र. ना बालमवार यांचे यासंबंधी आदेशाचे पत्र दाखवले आणि तात्काळ चौकशी आणि कारवाईची मागणी केली.
सावेडी रस्त्यावरील मोक्याची शासकीय दूध योजनेची जागा कवडी मोल भावात घेऊन वाणिज्यिक वापर करून अब्जावधी रुपये कमावण्याचा घाट घालताना या जागेवर बांधकाम परवानगी देतांना झालेले बेकायदेशीर काम तपासावे.
याची रीतसर चौकशी करावी, संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी, तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल व्हावा अशा मागण्या या सर्वपक्षीय नेत्यांनी केल्या आहेत,अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.