सारसनगरच्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार देण्याची गरज – आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते व सचिन सुसे यांच्या पुढाकाराने आमदार जगताप यांच्या 39 वाढदिवसानिमित्त 39 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रा. माणिक विधाते, सचिन सुसे, प्रा. अरविंद शिंदे, शिवाजी विधाते, मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के, मयुर भापकर, लहू कराळे, गणेश बोरुडे, सचिन शिंदे, निलेश इंगळे, संतोष हजारे, माऊली जाधव, कराळे, ऋषी ताठे, योगेश खताळ आदींसह शिक्षक, विद्यार्थी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, शिक्षणाने सामाजिक परिवर्तन घडून कुटुंबासह समाजाचा विकास साधला जातो. समाजात आजही मोठ्या प्रमाणात गरजू घटक असून, त्यांना शिक्षणासाठी आधार देण्याची गरज आहे. सर्वसामान्य घटकांतील विद्यार्थ्यांना आधार दिल्यास त्यांची परिस्थिती सुधारणार आहे. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे माध्यम असून, वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांसाठी घेतलेला उपक्रम दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, समाजाच्या विकासासाठी सर्वसामान्य गरजू घटकातील विद्यार्थ्यांना आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु आहे. लहान विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असून, त्यांच्या उज्वल भवितव्याच्या दृष्टीकोनाने व शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.