सुजय विखेंच्या उमेदवारीला भाजपातूनच विरोध
पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र
अहिल्यानगर, (प्रतिनिधी) – विद्यमान खासदार सुजय विखे यांनाच भाजपाने पुन्हा उमेदवारी जाहिर केल्यामुळे जिल्हा भाजपांतर्गत असंतोष उफाळून आला असून भाजपाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे पक्षश्रेष्ठींना पाठविले आहेत.
शेवगाव येथील भाजपाचे पदाधिकारी सुनील रासने यांनी विखेंच्या विरोधातील असंतोषाला सर्वप्रथम वाचा फोडली असून आपला राजीनामा त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविला आहे. यामध्ये त्यांनी विखे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करतानाच जनतेच्या सुविधांकडे विखेंना गेल्या पाच वर्षांच्या काळात दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.
रासने आपल्या पत्रात लिहीतात की, “सुजय विखे यांनी खासदार असताना कधीही शेवगावच्या नागरिकांच्या सुविधांकडे लक्ष दिलं नाही. निवडून आल्यानंतर पाच वर्षांमध्ये त्यांनी शेवगावच्या नागरिकांशी संवाददेखील साधला नाही. पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांना संघपरिवाराची आठवण फक्त पाच वर्षांनी होते. शिस्तीच्या पार्टीत आपण बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणं गरजेचं आहे, असेही या पत्रात नमूद आहे.
रासने यांनी भाजपचे शेवगाव सरचिटणीस, शहर उपाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, तालुका सरचिटणीस अशी अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. अनेक वर्षापासून ते भाजपाचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे वडील रामचंद्र रासने यांनीदेखील कारसेवेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे.महसूल विभागातील जनतेच्या सेवादेखील पैसे घेतल्याशिवाय सुटत नाहीत. पाच वर्ष मतदारांशी संबंध न जपणारे खासदार हे निवडणुकीच्या काळामध्ये नागरिकांना साखर व डाळ वाटणे, मतदार संघातील महिलांसाठी शिर्डी व शनिशिंगणापूर दर्शन, लहान मोठे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन मतदारांशी संवाद साधण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात असा आरोपही त्यानी केला आहे.
- Advertisement -