नेवासा (प्रतिनिधी) – सोनई येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना निंदणीय असून यातील आरोपीला फास्ट ट्रॅकवर खटला चालवून फाशीवर लटकाविण्याची मागणी रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केली आहे. मात्र या घटनेचे चित्रीकरण तसेच निर्दोष धर्मगुरुंना अडकविण्याचा घटनाक्रम पाहता या प्रकरणाला कुटील कारस्थानाचा वास येत असल्याने या प्रकरणाची उच्चस्तरिय सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.
सोनई येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला फाशीवर लटकवा, या प्रकरणात नाहक गुंतवून जेलमध्ये डांबण्यात आलेल्या दोन्ही ख्रिस्ती धर्मगुरुंची तातडीने सन्मानपूर्वक सुटका करावी, या घटनेचा निषेध करणाऱ्या आदिवासी बहिण, भावावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना जेरबंद करा, या मागण्यांसाठी नेवासा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच एकलव्य संघटनेच्या वतीने शिवाजीराव ढवळे, तसेच सुरेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली नेवासा तहसीलवर मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी मोर्चेकऱ्यांसमोर बोलताना थोरात म्हणाले की, संबंधित नराधमाने या कुकृत्यासाठी ख्रिस्ती प्रार्थनास्थळाचा वापर करुन धार्मिक भावना दुखावल्या आहेत. सदरच्या व्यक्तीचा या ख्रिस्ती प्रार्थनास्थळाशी तसेच धर्माशी कुठलाही संबंध नसताना त्याने प्रार्थनास्थळाचा गैरवापर केल्यावरुन संपूर्ण ख्रिस्ती समाजाला दोषी धरणे चुकीचे आहे. या घटनेचे चित्रीकरण आदी घटनाक्रम पाहता या प्रकरणाला कुटील कटकारस्थानाचा वास येत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. संबंधित नराधमाने या कुकृत्यासाठी ख्रिस्ती प्रार्थनास्थळाची निवड करणे, या घटनेचे व्हिडीओ चित्रिकरण, तसेच या घटनेशी दूरान्वयेही कुठला संबंध नसलेल्या निष्पाप ख्रिस्ती धर्मगुरुंना आरोपी करुन तुरुंगात डांबण्याची करण्यात आलेली घाई संशयास्पद असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. सदर आरोपीला शिक्षा होण्यसाठी संबंधित व्हिडीओ चित्रिकरण नियमानुसार पोलीसांकडे देणे आवश्यक असताना प्रथम ते सोशल मिडीयावरुन प्रसारित करुन धार्मिक, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रकारही घृणास्पद असून संबंधितांनी अत्याचारित अल्पवयीन मुलीची ओळख सार्वजनिक करुन पॉस्को कायद्यातील तरतुदींचा भंग केलेला असल्याने या घटनेत त्यांचाही आरोपी म्हणून समावेश करुन त्यांना जेरबंद करण्याची मागणी थोरात यांनी यावेळी केली.
सोनई पोलीस राजकीय लोकांच्या ताटाखालचे मांजर बनून कारभार करत असल्याचा सडेतोड आरोप शिवाजीराव ढवळे यांनी यावेळी बोलताना केला. केवळ प्रार्थनास्थळ परिसरात केलेल्या कुकृत्यासाठी या घटनेशी प्रत्यक्षात कुठलाही संबंध नसलेल्या ख्रिस्ती धर्मगुरुंना अडकविण्याची घाई, तसेच या प्रकरणाच्या निषेध मोर्चात सहभागी झालेल्या आदिवासी बहिण-भावावरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदविण्याची सोनई पोलीसांची कृती काही गोष्टी स्पष्ट करण्यास पुरेशा असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांत अल्पसंख्यांक, दलीत, आदिवासींवरील अन्याय, अत्याचारांच्या घटनांत चिंताजनक वाढ झाल्याकडे ढवळे यांनी यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधून सोनई पोलीस धर्मांध तसेच जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी करुन कर्तव्य टाळत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
यावेळी मोर्चामध्ये आर.पी.आय.चे तालुकाध्यक्ष सुशील धायजे, पप्पू इंगळे, मराठी मिशनचे डी.जी. भांबळ, छाया भोसले, प्रविण शिंदे, शामवेल साळवे, प्रविण नितनवरे, अनिल नन्नवरे, संतोष मोरे, नितीन भालेराव, संदीप चाबुकस्वार, आदींसह तालुक्यातील ख्रिस्ती धर्मियांसह दलीत, आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.