ह्युमिनिटी केअर फौंडेशनच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
सुसंस्कृत पाल्य हा पालकांचे चांगले भवितव्य – संपत बारस्कर
नगर : विद्यार्थी दशेमध्ये यश अपयश येत असते यात पाल्याने यशाला हुरळून न जाता ध्येय निश्चित करून सातत्य राखत आपल्या आवडीच्या क्षेत्रात यश प्राप्त करावे तसेच अपयशाला न घाबरता खचून न जाता जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश मिळवावे, पाल्य घडत असताना त्याच्यावर चांगले संस्कार होणे गरजेचे असते कारण सुसंस्कृत पाल्य हा पालकांचे चांगले भवितव्य आहे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल झाले असून विद्यार्थ्यांना करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहे, विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे जाऊन द्या, पालकांनी त्यांच्यावर दबाव न टाकता त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहावे, विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना आवड, निवड आणि अथक परिश्रम याकडे विशेष लक्ष द्यावे असे प्रतिपादन राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले.
ह्युमिनिटी केअर फौंडेशनच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला, यावेळी राष्टवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, मा.नगरसेवक डॉ.सागर बोरुडे,अमोल सायंबर,देव गुप्ता,हेमलता कांबळे,रंजना उक्कीर्डे,सुनिता दरेकर,सुरेखा फुलपगार,रोहिणी अंकुश,अपूर्वा पालवे,स्मिता भाकरे,रेणुका पुंड, यशवंत तोडमल,धीरज लोनारे,प्रज्वल शेकटकर,अक्षय वाणी,विनोद जोंधळे,अरुन आहेर,संदीप गोसावी,शरद गुंड तसेच विद्यार्थी पालक उपस्थित होते.
मा.नगरसेवक डॉ. सागर बोरुडे म्हणाले की, प्रभागाच्या विकास कामांबरोबर सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत वर्षभर विविध उपक्रम राबविले जात असतात या माध्यमातून नागरिकांची ऋणानुबंध निर्माण होत असतो विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे उज्वल भविष्य आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप मिळावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ह्युमिनिटी केअर फौंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला जातो, १० वी १२ वीतील सुमारे ३०० विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो या माध्यमातून ऊर्जा व प्रेरणा मिळत असते आणि पुढील वाटचाल यशस्वी होत असते असे ते म्हणाले.
सायंबर म्हणाले की, कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या हातामध्ये मोबाईल दिला आणि तो तसाच राहिला, मोबाईल जितका गरजेचा आहे तितकाच घातक आहे. मोबाईलमुळे पालक आणि मुलांमधील संवाद कमी होत चालला आहे. मोबाईलचा वापर कामापुता गरजेपुरताच केला पाहिजे, पालकांनी मोबाईल पासून विद्यार्थ्यांची पिढी लांब ठेवावी, जेणेकरून चांगला विद्यार्थी घडला जाईल, तसेच सध्याचे युग हे स्पर्धेचे असून त्यात टिकून राहण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे, विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासकीय नोकरीच्या पाठीमागे न लागता आपल्या आवडीच्या क्षेत्रात व्यवसाय करावा असे ते म्हणाले.