धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी लावली कलमे
अहमदनगर (प्रतिनिधी)- अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रवचनात ईस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन चरित्रावर चूकीचे व आक्षेपार्ह वक्तव्य करुन मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शुक्रवारी (दि.16 ऑगस्ट) संध्याकाळी तोफखाना पोलीस स्टेशन येथे रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामगिरी महाराज (मठाधिपती, सद्गुरु रामगिरी महाराज संस्थान श्री शेत्र गोदावरी धाम बेट, श्रीरामपूर) यांनी मौजे पंचाळे तालुका सिन्नर जि. नाशिक येथे 15 ऑगस्ट रोजी अखंड हरिनाम सप्ताहाच्या जाहीर प्रवचनात सर्व लोकांसमक्ष व लाईव्ह प्रक्षेपण सुरू असताना ईस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन चरित्रावर चूकीचे व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहे. नगर शहरात शुक्रवारी मुस्लिम समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.
संध्याकाळी उशीरा साहेबान अन्सार जहागीरदार (रा. राहणार बेलदार गल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या 302, 353 (2) कलमान्वये रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 15 ऑगस्ट रोजी रात्री मोबाईलच्या व्हाट्सअप वर मित्राने पाठवलेल्या मेसेजमध्ये रामगिरी महाराज ईस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे पाहिले. यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावले आहेत. रामगिरी महाराज यांनी हे वक्तव्य मौजे पंचाळे तालुका सिन्नर जि. नाशिक येथे केल्याचे समजले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. सदर गुन्हा एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशन (जि. नाशिक) येथे वर्ग करण्यात आला आहे.