दिवाळी सुट्टीचे घाईघाईत घेतलेल्या निर्णयाने शाळांचे नियोजन कोलमडले – बाबासाहेब बोडखे
अहमदनगर प्रतिनिधी – अगोदर जाहीर केल्याप्रमाणे दिवाळीच्या सुट्टयांप्रमाणे परीक्षांचे नियोजन करण्यात आले असताना, तातडीने सुट्टया जाहीर करुन सुट्टया कमी करण्यात आले असल्याने शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक व शिक्षकांचे नियोजन कोलमडले आहे. पुर्वी जाहीर केल्याप्रमाणे १ ते २१ नोव्हेंबर प्रमाणे दिवाळीच्या सुट्टया द्याव्या व राष्ट्रीय उपलब्धी सर्व्हेक्षण २१ नोव्हेंबर नंतर घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद प्रधान व महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना शिक्षक परिषदचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार, राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, महिला आघाडीप्रमुख पूजाताई चौधरी, मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, संघटनमंत्री सुहास हिर्लेकर यांनी पाठवले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
शिक्षण विभागाने आधी १ ते २१ नोव्हेंबर दिवाळीच्या सुट्टया जाहीर केल्या होत्या.शिक्षण सचिवांनी काढलेल्या पत्रकाप्रमाणे शिक्षणमंत्र्यांनी २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दिवाळी सुट्टीची घोषणा केली. अत्यंत तातडीने हा निर्णय घेतल्याने सर्व शाळांचे नियोजन कोलमडले आहे.
नव्याने काढलेल्या सुट्टयांच्या परिपत्रकाची सक्ती करु नये. शाळेने केलेले ३० नोव्हेंबर पर्यंतचे नियोजन पूर्ण होऊ द्यावे.तर केंद्रीय स्तरावरुन १२ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय उपलब्धी सर्व्हेक्षण घेण्याचे ठरवले आहे.या काळात शिक्षक, विद्यार्थी दिवाळी सुट्टीनिमित्त आपल्या गावी जात असतात. या सर्व्हेक्षणात त्यांना सहभागी होण्यास मोठी अडचण निर्माण होणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
१० नोव्हेंबर पर्यंत सुट्टीचे घाईघाईत काढलेले परिपत्रक त्वरीत मागे घेऊन ठरल्याप्रमाणे शाळांना सुट्टी द्यावी, राष्ट्रीय उपलब्धी सर्व्हेक्षण २१ नोव्हेंबर नंतर घेण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीसाठी राज्य व जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रयत्नशील आहेत.