मतदारसंघातील मिरजगाव व खर्डा येथे नव्या पोलीस ठाण्यांना मंजुरी
________________________________
जामखेड दि.२७ (प्रतिनिधी नासीर पठाण )
राष्ट्रवादीचे युवा नेते आ.रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने मतदारसंघातील कर्जत व जामखेड तालुक्याच्या पोलीस ठाण्याचे विभाजन होऊन आता मिरजगाव व खर्डा या ठिकाणी स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण होऊन त्या अनुषंगाने मनुष्यबळ उपलब्ध करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे अनेक वर्षांच्या प्रतिक्षेला कायमचाच पुर्णविराम मिळाला आहे.या दोन्ही पोलीस ठाण्यात प्रत्येकी ६ संवर्गातील एकुण ७० अधिकारी-कर्मचारी पदभार सांभाळणार आहेत. आ.रोहित पवारांनी पोलीस ठाण्यांना मंजुरी मिळवून,दाखवलेली ही ‘पॉवर’ नागरीकांच्या संरक्षणासाठी व कायदा-सुव्यवस्थेसाठी मोलाची ठरणार आहे.त्यांनी पोलीस यंत्रणेला सक्षम करण्यासाठी विशेष काळजी घेतली आहे.कित्त्येक वर्षांचा रखडलेला पोलिस वसाहतीचा प्रश्न त्यांनी केलेल्या पाठपुराव्याने मार्गी लागत आहे. पोलीस यंत्रणा अधिक गतिमान करण्यासाठी दोन ‘योद्धा’ चारचाकी वाहने,४ दुचाकी, ८ पोलिस चौक्या उपलब्ध केल्या आहेत. गुन्ह्यांचा तपास जलद गतीने लागावा व गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी कर्जत व जामखेड शहरात सीसीटीव्ही संयंत्रणाही लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्यांचे हे प्रयत्न गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रभावी ठरत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या खाजगी सावकारकीला आळा,महिलांच्या प्रश्नांसाठी असलेले भरोसा सेल,तात्काळ मदतीसाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा असे प्रभावी समाजपयोगी उपक्रम नागरीकांच्या सुरक्षेसाठी ढाल बनून काम करत आहेत.त्यातच आता मंजुर झालेल्या या अधिकच्या पोलीस ठाण्यांमुळे तात्काळ गुन्हेगारांना जेरबंद करता येणार आहे.आणि नागरिकांना वेळेत सुविधा देणे शक्य होणार आहे.नागरिकांची अनेक वर्षांपासून असलेली ही मागणी अखेर आ.रोहित पवार यांनी पुर्ण केली आहे. दडपशाही,खोट्या गुन्ह्यांची संख्या कमी होऊन आता सर्वसामान्य नागरिकांचा आवाज मतदारसंघात वाढलेला दिसुन येतो हा बदल निश्चितच प्रत्येकाला सुखावणारा आहे. आ.रोहित पवारांच्या या मोठ्या कामाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
नागरीकांच्या हितासाठी काहीही!
‘नव्याने मंजुर झालेल्या पोलीस ठाण्यांमुळे मतदारसंघात मनुष्यबळ वाढणार आहे.आता गुन्ह्यांना अधिक आळा घालणे शक्य होईल.महिला-मुलींवर होणारे अन्याय- अत्याचार,सावकारकीची धास्ती, खून, चोऱ्या, घरफोड्या यावर योग्य नियंत्रण ठेवता येईल.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,पालकमंत्री हसन मुश्रीफ आदींचे याकामी मोलाचे सहकार्य लाभले त्यांचे मी आभार मानतो”.
– आ.रोहित पवार
अशी असेल पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदसंख्या:
मिरजगाव:
सहायक पोलिस निरीक्षक १,पोलिस उपनिरीक्षक १,सहायक पोलिस उपनिरीक्षक ३,पोलीस हवालदार ६,पोलीस नाईक९,पोलीस शिपाई १५ एकुण-३५
खर्डा:
सहायक पोलिस निरीक्षक १,पोलिस उपनिरीक्षक १,सहायक पोलिस उपनिरीक्षक ३,पोलीस हवालदार ६,पोलीस नाईक९,पोलीस शिपाई १५ एकुण-३५