अल्पवयीन मुलांची नग्न धिंड काढणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करुन जिल्ह्यातून हद्दपार करा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीची मागणी ; जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
अन्यथा मंगळवारी उपोषणाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी) – नवनागापूर येथे अल्पवयीन मुलांचे अपहरण करुन त्यांना बेदम मारहाण करीत नग्न धिंड काढणाऱ्या आरोपींच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करुन जिल्ह्यातून हद्दपार करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा रिपाई महिला आघाडीच्या वतीने मंगळवारी (दि.2 जून) रोजी पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी महिला शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार, रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, अनिता भोसले, मीरा आरु, विमल लाळगे, सविता काळे, त्रिवेणी रेवणे, अनिता भोसले, मीना काळे, बाबासाहेब आरु, नितीन जंगम, सुरेश काळे, ऋषिकेश धाकतोडे, दीपक गवळी, अनिकेत सोनवणे, राजेंद्र गायकवाड, दत्तात्रय कुदांडे, आवेज सय्यद, फैजल खान आदी उपस्थित होते.
24 जून रोजी नवनागापूर येथे राहुल पाटील, विशाल काटे, प्रविण गीते, प्रशांत वंजारे, हर्षल गायकवाड, करण काळे, विशाल कापरे, सोनू शेख, आर्यन शेवाळे, सागर दारकुंडे, सुरज शिंदे, पप्पू पगारे, रोहित यांच्या टोळीने अल्पवयीन मुलांवर त्यांच्या घरातून अपहरण करुन शेंडी बायपास येथील मोकळ्या पटांगणात डांबून ठेवून नग्न करून त्यांची धिंड काढली व त्यांचे हातपाय बांधून लाकडी दांडक्याने बेदम मारहाणी केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. या टोळीने केलेले कृत्य अत्यंत निंदनीय आहे.
मुलांना वाचविण्यासाठी त्यांच्या पालकांनी देखील मध्यस्थी केली, मात्र त्यांना देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यामध्ये वयस्कर महिला देखील होत्या. धिंड काढल्याने व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलीस प्रशासनाने देखील संबंधित मुलांच्या कुटुंबीयांची कोणतीही तक्रार घेण्यास नकार दिला व सर्वत्र ही बातमी पसरल्याने शेवटी गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना जिल्ह्याच्या दृष्टीने निंदनीय असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
राहुल पाटील व त्यांच्या सर्व साथीदारांच्या टोळीवर यापूर्वी देखील गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीचे सदस्य नवनागापूर, एमआयडीसी, वडगाव गुप्ता या भागामध्ये दहशत करत असून, मोक्कातंर्गत कारवाई करून, त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची मागणी रिपाई महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.