अल्पवयीन मुलीचे अपहरण व बलात्काराच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता
नगर तालुक्यातील घटना
अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे आरोपीने अपहरण करून तिच्यावर तीन ते चार वेळा बलात्कार केल्याच्या आरोपातून विशेष सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
पोलिसांच्या तपासात असे निष्पन्न झाले होते की, आरोपीने पीडीतेला लग्न करू अशी फुस लावून तिला गावातील एका कॉलेजच्या मागे बोलून तिचे अपहरण करून नेले होते. त्यानंतर आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडिलांनी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे त्यांच्या मुलीचे अपहरणाची फिर्याद दिली होती. पोलिसांनी पीडीतेला व आरोपीला तेलगाव (जि. बीड) येथून ताब्यात घेतले असता, पिडीतेने पोलिसांना झालेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी पीडीतेची वैद्यकीय तपासणी केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला व त्या तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपीने पीडितेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केलेला आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोपी विरुद्ध विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाने आरोपीविरुद्ध गुन्हे सिद्ध करण्याकामी एकूण 10 साक्षीदारांच्या साक्ष नोंदविल्या. त्यामध्ये पीडीतेची तसेच तिच्या वडिलांची व वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष सर्वात महत्त्वाची होती. आरोपीने त्यांच्यातर्फे केस चालविण्याकामी ॲड. परिमल फळे यांची नियुक्ती केली. त्यानुसार आरोपीतर्फे ॲड. फळे यांनी साक्षीदारांचे उलटतपास घेतले. यामध्ये पीडीतेचा घेतलेला उलट तपास महत्त्वाचा ठरला. आरोपीतर्फे ॲड. फळे यांनी मांडलेली बाजू, त्या अनुषंगाने साक्षीदारांचे घेतलेले उलट तपास व न्यायालयांसमोर केलेला युक्तिवाद विशेष सत्र न्यायाधीश एम.एच. मोरे यांनी ग्राह्य धरून आरोपीची निर्दोश मुक्तता केली. सदर खटल्यात ॲड. परिमल फळे यांना ॲड. आशिष पोटे, ॲड. अक्षय कुलट, ॲड. आनंद कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.