शिशु संगोपन संस्थेच्या पुर्व प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांचे जोकरच्या उड्या, तुतारीचा निनाद, पायांचे ठसे घेत स्वागत
डिजिटल रुमसह हसत-खेळत शिक्षण देण्यावर भर – दशरथ खोसे
नगर – शाळा म्हटले की लहान मुलांच्या मनात भिती असते, अभ्यास, शिक्षकांची छडी यांची धास्ती मुलं घेतात, परंतु शिशु संगोपन शाळेतील पुर्व प्राथमिक विद्यार्थ्यांचे हसत-खेळत स्वागत करत शाळेची भितीच घालविली. आलेल्या विद्यार्थ्यांना तुतारीच्या निनादात स्वागत करण्यात आले, मुलांचे औक्षण केले, मुलांच्या पायाचे ठसे घेत शाळेत प्रवेश केला. त्यानंतर जोकरने मुलांचे स्वागत करुन मुलांना चॉकलेट दिले. कार्टूनची रांगोळी, खेळण्यातील सायकली, घसरगुंडी अशा विविध खेळण्या पाहून या मुलांच्या चेहर्यावर आनंदाला पारावर राहिला नाही. या अभुतपूर्व स्वागताने मुलांमधील शाळेची भितीच नाहिशी झाली व मुले शाळेत रमली.
शिशु संगोपन संस्थेच्या पुर्व प्राथमिक वर्गाचा शुभारंभ विद्यार्थ्यांचे औक्षण करुन, पायांचे ठसे, गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव र.धों.कासवा, खजिनदार अॅड.विजयकुमार मुनोत, सहसचिव राजेश झालानी, मुख्याध्यापिका योगिता गांधी, विनोद कटारिया, छाया मेहेर, विद्या साळूंके, वैशाली लांडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी उपाध्यक्ष दशरथ खोसे म्हणाले, शिशु संगोपन संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोपरि प्रयत्न केले जात आहेत. पुर्व प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. लहान मुलांना चित्र रुपी अभ्यासक्रम, गाण्यातून कविता, डिजिटल रुम, खेळण्याद्वारे शिक्षण देण्यात येत असल्याने विद्यार्थीही शाळेत रमत आहेत. सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थी असल्याने जास्तीत जास्त सुविधा देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी र.धों. कासवा म्हणाले, प्राथमिक वर्गातूनच विद्यार्थ्यांचा पाया पक्का करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी संस्थेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी विजयकुमार मुनोत, राजेश झालानी यांनीही मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशद्वारावर औक्षण करण्यात आले आहे. या स्वागताने मुलांना शाळेविषयी गोडी लागेल. त्यांना दर्जेदार शिक्षणा देण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. कारण हे विद्यार्थी उद्याचे भविष्य असल्याने त्यांच्या सर्वांगिण विकास साधण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.
यावेळी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका योगिता गांधी यांनी प्रास्तविकामध्ये या वर्गाविषयी माहिती देऊन शाळेच्यावतीने राबविण्यत येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या साळूंके यांनी केले तर आभार छाया मेहेर यांनी मानले. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाने सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाचे पालकांनी स्वागत करुन कौतुक केले.