अहमदनगर प्रतिनिधी – शहरातील शक्कर चौक ते जीपीओ चौक या दरम्यान उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असल्याने शहरातील इंम्पेरिअल चौक ते शक्कर चौक दरम्यान वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. याबाबत नागरिक व वाहनचालकांकडून काही हरकती मागविण्यात आल्या होत्या. परंतु दिलेल्या मुदतीत एकही हरकत प्राप्त न झाल्यामुळे सदर वाहतूकीतील बदल कायम ठेवण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी 17 जुन ते 30 जुन पर्यंत वाहतुक मार्गामध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्याबाबतचे आदेश पारित केले आहेत.
पुणे कडून औरंगाबाद कडे जाणारे वाहतुकीकरिता मार्ग शक्कर चौक- टिळक रोड- आयुर्वेदिक कॉलेज कॉर्नर-राज पॅलेस रोड- स्वस्तिक चौक मार्गे औरंगाबादकडे वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
नेप्ती नाका- टिळक रोडने पुणे / औरंगाबाद कडे जाणारी वाहतूक नेप्ती नाका -आयुर्वेदिक कॉलेज कॉर्नर -राज पॅलेस रोड स्वस्तिक चौक मार्गे सुरू करण्यात आली आहे.
अहमदनगर रेल्वे स्टेशनकडून पुणे / औरंगाबाद कडे जाणारी वाहतूक शक्कर- चौक टिळक रोड -आयुर्वेदिक कॉलेज कॉर्नर- राज पॅलेस रोड स्वस्तिक चौक मार्गे औरंगाबादकडे जाईल.
तसेच अहमदनगर रेल्वे स्टेशन -कायनेटीक चौक मार्गे पुण्याकडे वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
औरंगाबाद कडून पुणेकडे जाणारे वाहतूक इंम्पेरिअल चौक – चाणक्य चौक – आनंदऋषीजी हॉस्पीटल रोड- शक्कर चौक मार्गे पुणे तसेच पुणेकडे जाणाऱ्या एस.टी बसेस करिता स्वास्तिक चौक-चाणक्य चौक- आनंदऋषीजी हॉस्पीटल रोड- शक्कर चौक मार्गे पुण्याकडे वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
ज्या वाहनचालकांना शक्कर चौक येथुन अहमदनगर रेल्वे स्टेशनकडे जायचे असेल त्यांनी कायनेटीक चौक मार्गे रेल्वे स्टेशनकडे जाणारे मार्गाचा वापर करावा.
सर्व प्रकारची अवजड वाहतूक शहराबाहेरील बायपास मार्गे वळविण्यात यावी. रेल्वे स्टेशन येथील मालधक्यावरील वाहने, अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने व शासकीय अन्नधान्याची वाहतूक करणारे अवजड वाहनांना सदर आदेश लागू राहणार नसून त्यांची वाहतूक यापूर्वी लागू असलेल्या आदेशाप्रमाणे सुरू राहील.
परंतु सदरचे काम पूर्ण होईपर्यंत नमूद मालाची वाहतूक करणेकामी जास्तीत जास्त हलक्या वाहनांचा वापर करावा. असे आवाहन ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकाद्वारे केले आहे.