किरण काळेंच्या नेतृत्वाखाली शहरात मजबूत संघटन उभे करणार – क्षेत्रे
अहमदनगर प्रतिनिधी : आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश सचिव सुनील क्षेत्रे यांनी माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. क्षेत्र हे आंबेडकरी चळवळीत मागील सुमारे ३२ वर्षांपासून कार्यरत असून त्यांचा शहरासह जिल्ह्यामध्ये मोठा जनसंपर्क आहे. त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे शहरातील काँग्रेस अधिक बळकट होणार आहे. काळेंच्या नेतृत्वाखाली शहरात पक्षाचे मजबूत संघटन उभे करणार असल्याचे प्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना क्षेत्रे यांनी म्हटले आहे.
आगामी सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्षेत्र यांनी प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर नुकताच हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी जिल्हाध्यक्ष काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला आदी उपस्थित होते.
सुनील क्षेत्रे हे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांचे निकटवर्तीय म्हणून मागील सुमारे सतरा वर्षांपासून कार्यरत होते. त्यांनी यापूर्वी जिल्हाध्यक्ष पदाची देखील जबाबदारी समर्थपणे पार पाडलेली आहे. जिल्हा दक्षता समिती व जिल्हा शांतता समितीवर त्यांनी अनेक वर्ष काम केले आहे. लोकराजा छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. दलित पॅंथरमध्ये पाच वर्ष, भारिप बहुजन महासंघामध्ये दहा वर्ष त्यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत. विशेषत: शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असणारा मंगल गेट परिसर हा त्यांचा बालेकिल्ला समजला जातो.
किरण काळे म्हणाले की, शहरामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील बांधवांची संख्या मोठी आहे. या घटकाचे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. क्षेत्रे यांच्या माध्यमातून त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांच्यामागे पक्षाचे बळ, ताकद उभी केली जाईल. आ. बाळासाहेब थोरात 2यांच्या माध्यमातून शासन दरबारी त्यासाठी पाठपुरावा केला जाईल. क्षेत्रे यांच्यावर लवकरच काँग्रेस पक्षामध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सुतोवाच यावेळी बोलताना काळे यांनी केले आहेत.