शिक्षक भाऊसाहेब कबाडी यांचा स्तुत्य उपक्रम.
अहमदनगर प्रतिनिधी – विक्रम लोखंडे
महानगरपालिकेच्या केडगाव येथील ओंकारनगर प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले भाऊसाहेब कबाडी यांनी आपली आई कै.मंडाबाई शंकर कबाडी यांच्या स्मरणार्थ शेवगाव तालुक्यातील वडुले बुद्रुक येथील आपल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला प्रिंटर भेट दिला.
कार्यक्रमासाठी वडुले बुद्रुकचे सरपंच प्रदीप काळे, गंगाधर चोपडे, भाऊसाहेब चोपडे,विजय चोपडे, राम हरदास, अश्विनी पाटील,बाबासाहेब येवले, भाऊसाहेब गिरगे,संतराम कबाडी,शंकर कबाडी,वर्षा कबाडी, इंदुबाई येवले,सिंधुबाई गिरगे,अमोल गिरगे,मनिषा गिरगे, भाऊसाहेब कबाडी, मुख्याध्यापिका शकुंतला अकोलकर,माधवी पाचारणे,रुपाली उकिर्डे, राहुल गोर्डे उपस्थित होते.
वडुले बुद्रुक शाळेच्या इतिहासातील पहिलीच अशी घटना आहे की, शाळेच्या माजी विद्यार्थ्याने आपल्या आईच्या स्मरणार्थ शाळेला सतरा हजार रुपये किंमतीचा प्रिंटर भेट दिला आहे.भाऊसाहेब कबाडी यांनी सर्वांसाठी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन गावातील आणखी माजी विद्यार्थी वडुले बुद्रुक शाळेला नक्की मदत करतील, असे सरपंच प्रदीप काळे म्हणाले.
शिक्षक भाऊसाहेब कबाडी यांनी अतिशय खडतर परिस्थितीत शिक्षण घेतले.त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी कापड दुकानात काम केले.परिश्रम आणि शिक्षणाबद्दलची गोडी यामुळेच ते यशस्वी झाले. शाळेतील विद्यार्थ्यांनीही त्यांचा आदर्श घेऊन उच्च शिक्षण घ्यावे,असे गंगाधर चोपडे म्हणाले.
शिक्षण आपले भविष्य कसे बदलू शकते याचे उत्तम उदाहरण शिक्षक भाऊसाहेब कबाडी हे आहेत.खडतर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी जिद्द व चिकाटी असली तर सर्व मार्ग सोपे होतात,असे भाऊसाहेब चोपडे म्हणाले.
मी आज जो काही आहे,त्यामध्ये माझे आईवडील व माझी प्राथमिक शाळा यांचे मोलाचे योगदान आहे.माझ्या शाळेमुळे व शिक्षकांमुळेच मी घडलो.शाळेच्या ॠणातून मुक्त होण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.भविष्यात यापुढेही वडुले बुद्रुक शाळेला जी काही मदत लागेल,ती आपण देऊ,असे भाऊसाहेब कबाडी आपल्या मनोगतात म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गोर्डे यांनी केले तर शकुंतला अकोलकर यांनी आभार मानले.