सायबर सेलकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची तक्रार दाखल
अहमदनगर प्रतिनिधी – शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट उघडून त्याचा गैरवापर केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. यासंदर्भात आ. जगताप यांच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पोलिसांच्या सायबर शाखेला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडे निवेदनातून तक्रार करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, सचिन जगताप सागर गुंजाळ, सुरेश बनसोडे, अमित खामकर, भरत गारुडकर, मंगेश खताळ, ऋषिकेश ताठे, मोहन गुंजाळ, अतुल कावळे, सत्यजित ढवण, सुधीर जाधव, शंकर नरसाळ, सागर सोबले, राहुल बोरुडे, जितू बनकर, उमेश धोंडे आदी उपस्थित होते.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की, आ. संग्राम जगताप यांच्या नावाने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर बनावट अकाऊंट उघडून त्याद्वारे अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्या आहेत. सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या कार्यालयाकडून सदरचे अकाऊंट हे बनावट असल्याचे सांगण्यात आले. याबाबत पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आम्हाला आमच्या स्वत:च्या नावाचे संग्राम जगताप असे फेसबुकवर कोणीतरी अज्ञात इसमाने जाणिवपूर्वक आमचा स्वत:चा फोटो लावून बनावट अकाऊंट चालू केले असून, ते अकाऊंट कोणीतरी वापरत आहे. त्या अकाऊंटवरील समाजातील विविध व्यक्तींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जात आहे. सदरची अज्ञात व्यक्ती माझे नाव, माझे पद व माझी समाजातील असलेली प्रतिष्ठा याचा गैरवापर करून काहीतरी चुकिचे घडवून आणू शकते, त्यामुळे सदरचे बनावट अकाऊंट हे तत्काळ बंद करून संबंधित अज्ञात व्यक्ती कोण? याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे कोणाचीही कशाही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी ही तक्रार करण्यात आली असून, नागरिकांनीही आ. जगताप यांच्या फेसबुक अकाऊंटबाबत खात्री करताना जेथे निळी टिक (ब्ल्यू व्हेरिफाईड) तेच अधिकृत अकाऊंट असल्याचे समजावे, असे आवाहन आ. जगताप यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.