सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला होता मोकाटेचा जामीन
अहमदनगर(प्रतिनिधी)- मागासवर्गीय महिलेचे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फरार असलेला आरोपी गोविंद मोकाटेला तब्बल साडेचार महिन्यानंतर मंगळवारी (दि.२६ एप्रिल) तोफखाना पोलीसांनी अटक केली.
मोकाटेला सुनावणीसाठी जिल्हा न्यायालयात हजर केले असता, ३० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अटकपुर्व जामीनसाठी जिल्हा न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या मोकाटेला दिलासा देण्यात आला नसून, सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा जामीन फेटाळला आहे.
जेऊर (ता.नगर) येथील एका पक्षाचा राजकीय पुढारी असलेल्या गोविंद मोकाटे याने महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आरोपीवर अॅट्रॉसिटी अॅक्टप्रमाणे वाढीव कलम देखील लावण्यात आलेले होते.
गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. त्याने अटकपूर्व जामीनसाठी जिल्हा सत्र न्यायालय, उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात अटकपुर्व जामीन ठेवला होता. तिन्ही कोर्टाने त्याचा जामीन फेटाळला आहे. पोलिसांनी आरोपी मोकाटेला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले अशी माहिती तोफखाना पोलिसांनी दिली.