खासदार विखे यांच्या आजोबा यांनी देखील कधीही इंग्रजीत भाषण केले नाही -ॲड. सुरेश लगड
इंग्रजी भाषेपेक्षा लोकांच्या प्रश्नांचे ज्ञान व प्रश्न सोडवण्याची कुवत असलेला खासदार हवा
अहमदनगर (प्रतिनिधी)- संसदेत निवडून जाणाऱ्या लोकप्रतिनिधीकडे मुसद्दीपणा आणि लोकांची भक्ती, लोकांच्या प्रश्नांचे ज्ञान, त्यांचे प्रश्न सोडवण्याची कुवत आणि सातत्याने काम करणारा नेता असला पाहिजे. इंग्रजी भाषा येत असल्याने तो प्रश्न सोडविलच याची शाश्वती देता येत नाही. दुर्दैवाने दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघ काम करणाऱ्या नेत्या अभावी पोरका ठरला असल्याची खंत ॲड. सुरेश लगड यांनी व्यक्त केली आहे.
खासदार सुजय विखे यांनी जाहीर सभेत प्रतिस्पर्धी उमेदवार निलेश लंके यांना इंग्रजीत भाषण करण्याचे आव्हान दिल्याने ॲड. लगड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे त्यांच्या या आव्हानाचे खंडन करुन भूमिका मांडली. ॲड. लगड म्हणाले की, अनेक वेळेस खासदार सुजय विखे यांचे आजोबा स्व. बाळासाहेब विखे खासदार म्हणून निवडून गेले, परंतु त्यांनी संसदेत इंग्रजीत भाषण केल्याबद्दलची नोंद कुठेही आढळत नाही. स्व. बाळासाहेब विखे यांच्याबद्दल आपल्याला आदर असून, नातूला याची कल्पना देण्यासाठी एकाच गावातील असल्याने राजकारणात सबुरीचा सल्ला देत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
संसदेमध्ये मराठीत बोलले तरी इंग्रजी, हिंदी मध्ये भाषांतर करून सभापती व संसदेला ऐकता येते. देशाला देखील त्या भाषणाचे कोणत्याही भाषेत भाषांतर ऐकता येते. याबाबतची माहिती सुजय विखे यांना माहित असावी. सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके हे लोक कल्याणकारी नेते आहेत. याची जाणीव कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण महाराष्ट्राला झाली आहे. या कोरोना काळात सुजय विखे आणि त्यांचे पिताश्री सातत्याने घरात बसून होते, याची जाण देखील अहमदनगर जिल्ह्याला आहे. दिलीप गांधी यांनी उड्डाणपूल मंजूर करून घेतला होता. नगरचा उड्डाणपूल करण्याचे भांडवल फक्त खासदार विखे करत आहेत.
इंग्रजीमध्ये फडाफड भाषण करणारे नगर जिल्ह्यात अनेक लोक आहेत. म्हणून त्यांना खासदार म्हणून संसदेत पाठविता येणार नाही. लोकांचे प्रश्न संसदेमध्ये आणि सरकार पुढे सातत्याने मांडून प्रश्न सोडवून घेणे हे नेत्याचे काम आहे आणि ही गोष्ट खासदारकीसाठीचे उमेदवार निलेश लंके हे नक्कीच करतील. त्यामुळे दक्षिण नगर मतदार संघामध्ये लोकांची भक्ती असणारे, लोकांच्या प्रश्नांची तंतोतंत जाणीव असणारे, लोकांसाठी रात्रंदिवस काम करणारे लंके हे रास्त उमेदवार आहेत. ही बाब घराघरात पोहोचली असून, यामुळे विखे पाटील यांच्या पायाखालची वाळू आता सरकायला लागली आहे. ज्यांच्या कुटुंबात पक्षाची चाड कधीही नव्हती आणि ज्यांनी सोयीप्रमाणे पक्ष बदलले, अशा व्यक्तींच्या शब्दाला नगर दक्षिण मतदार संघामध्ये कवडीची किंमत नसल्याचे ॲड. लगड यांनी म्हंटले आहे.