एमआयडीसीत मारहाण, चोऱ्या व लुटमारीने दहशतीचे वातावरण

- Advertisement -

आमीच्या पुढाकारातून उद्योजक, पोलीस अधिकारी व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठक

लुटमार थांबविण्यासाठी पोलीस प्रशासन वाढविणार गस्त; तर अतिक्रमण हटवून पथदिवे सुरळीत करण्याचे एमआयडीसी प्रशासनाचे आश्‍वासन

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील एमआयडीसीत रात्री कामावरून परतणाऱ्या कामगारांना रस्त्यात अडवून केली जाणारी मारहाण, वारंवार होणाऱ्या चोऱ्या व लुटमारीने दहशतीचे वातावरण निर्माण झालेले असताना यावर उपाययोजना करण्यासाठी उद्योजकांच्या आमी संघटनेच्या पुढाकारातून उद्योजक, पोलीस अधिकारी व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. हा प्रकार थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाने गस्त वाढविण्याचे तर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटवण्याचे, पथदिवे सुरळीत ठेवण्याचे आश्‍वासन दिले.

एमआयडीसी मधील कंपन्यातून चोऱ्यांच्या घटना सर्रासपणे घडत आहे. विशेषतः बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये वारंवार चोऱ्या होत असून, नुकतेच कामावरून परतणाऱ्या तीन कामगारांना रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भागात वाढत चाललेली गुन्हेगारी प्रवृत्ती थांबविण्यासाठी व एमआयडीसी प्रशासनाकडून सुविधा मिळण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

एमआयडीसीमध्ये ट्रक टर्मिनल नसल्यामुळे माल घेऊन येणारे व जाणाऱ्या वाहनांना चोरट्यांचा त्रास सहन करावा लागतो. या वाहनांच्या काचा फोडल्या जातात, त्यामुळे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात ट्रक टर्मिनलची व्यवस्था करण्याचे आश्‍वासन दिले. औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करण्याच्या ठिकाणी सन फार्मा, सह्याद्री व गरवारे चौक येथे वारंवार वाहतूक कोंडी होते, हाणामाऱ्यांच्या घटनांनी त्यात भर पडते. तेथेही पोलीस नियुक्त करण्याचे आश्‍वासन सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिले. लवकरच अतिक्रमण हटाव मोहीम राबवून टपऱ्या जप्त केल्या जातील, असे एमआयडीसीचे उपअभियंता संदीप बगडे व रवींद्र मोटे यांनी सांगितले.

उद्योजकांनी आपल्या केवळ कंपनीच्या आवारात सीसीटीव्ही न लावता, रस्त्यावरही सीसीटीव्ही लावावे त्यामुळे अनेक गैरप्रकार थांबविता येणार असल्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. नागापुर चौकात पोलीस चौकी सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला जाईल, साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवली जाईल, कंपन्यांकडील नोंदवहीत भेटीची नोंद केली जाईल असे आश्‍वासन सहाय्यक निरीक्षक चौधरी यांनी दिले.

यावेळी उद्योजकांच्या आमी संघटनेचे पदाधिकारी महेश इंदानी, राजेंद्र कटारिया, संजय बंदिष्टी, अरुण कुलकर्णी, प्रवीण बजाज, मिलिंद गंधे, मिलिंद कुलकर्णी, राजीव गुजर, प्रशांत विश्‍वासे, राजेंद्र शुक्रे, कल्पेश इंदानी, पुरुषोत्तम सोमानी, जुईली मुळे, विजय इंगळे, चिन्मय सूखथनकर, प्रफुल्ल नातू, निनाद टीपूगडे, नितेश लोढा आदी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles