दिपक कासवा,अहमदनगर
एसटी महामंडळाच्या बसला अचानक लागली आग; लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचा वाचला जीव
अहमदनगर – मनमाड मार्गावर एसटी महामंडळाच्या श्रीरामपूर – राहुरी – अहमदनगर (बस क्रमांक MH 20 BL 4163) या एसटी बसला अचानक आग लागली. या बसमधून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे अहमदनगरच्या लोहमार्ग पोलिसांना दिसले. लोहमार्ग पोलिसांनी या एसटी बसचा पाठलाग करून सदर एसटी बस तात्काळ थांबवून प्रवाशांना खाली उतरवले. फायर एक्झीबिटरच्या साहाय्याने एसटी बसला लागलेली आग विझविली. सदर एसटी बसमधील 27 प्रवासी, ड्रायव्हर आणि वाहक यांना एसटी बसमधून सुरक्षित बाहेर काढले. प्रसंगावधान राखत पोलिसांनी एसटीला लागलेली आग विझविल्याने मोठी दुर्घटना टळली.
अहमदनगर लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संजय लोणकर, पोलीस हवालदार उमेश कोंगे, पोलीस शिपाई रवींद्र देशमुख, नितीन कोळपकर, पोलीस नाईक इरफान शेख यांच्या पथकाने एसटी बसला लागलेली आग विझवण्यासाठी मदत केली. आग लागलेल्या एसटी मधून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याबद्दल एसटी बसमधील प्रवाशांनी लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले.